AS Traders Scam Case | ए. एस. ट्रेडर्सच्या २२.५ कोटींच्या मालमत्ता लिलावास शासन मंजुरी Pudhari File Photo
कोल्हापूर

AS Traders Scam Case | ए. एस. ट्रेडर्सच्या २२.५ कोटींच्या मालमत्ता लिलावास शासन मंजुरी

लवकरच प्रक्रियेस सुरुवात; सक्षम प्रारूप अधिकारी म्हणून करवीर प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

आशिष आडिवरेकर

कोल्हापूर : दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांच्या ५३ कोटी ३७ लाखांच्या फसवणूकप्रकरणी ३९ संशयितांच्या जप्त केलेल्या २२ कोटी ४७ लाखांच्या मालमत्ता लिलावास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. कोल्हापूर पोलिसांनी पाठविलेल्या या प्रस्तावाच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर लवकरच या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. सक्षम अधिकारी म्हणून करवीर प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या ए. एस ट्रेडर्सच्या लोहितसिंग सुभेदारसह ३९ जणांवर नोव्हेंबर २०२२ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर नागपूर, नांदेड, पुणे येथे दोन, लोणावळा, कोल्हापूर या ठिकाणी सहा गुन्हे दाखल झाले. आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने याप्रकरणी ३९ संशयितांची नावे निष्पन्न करून त्यांची कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, सोलापूर, सातारा येथील २२ कोटी ४७ लाखांची मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्ता जप्तीचे तीन प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले होते. या तीनही प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून, करवीर प्रांताधिकाऱ्यांची सक्षम प्रारूप अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

बाजारभावाप्रमाणे ४० कोटींपर्यंत किंमत

आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ३९ आरोपींची स्थावर, जंगम अशी २२ कोटी ४७ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये फ्लॅट, भूखंड, मोटार, सोने, इतर गुंतवणुकीचा समावेश आहे. या सर्वांची किंमत बाजारभावाप्रमाणे जास्त होऊन गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त रक्कम देण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे.

ए. एस. ट्रेडर्स घोटाळाप्रकरणी जप्त केलेल्या मालमत्ता लिलावाबाबत शासनाकडून मंजुरी आली आहे. लवकरच न्यायालयीन प्रक्रिया करून मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे.
नीलोत्पल पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT