कुरुंदवाड : येथील गोठणपूर पिसाळलेल्या कुत्र्याने एका नागरिकासह चार रेडकांवर हल्ला करुन जखमी केले आहे. आनंदा किसप्पा प्रधाने असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, कुत्र्यांची गोठणपूर परिसरामध्ये दहशत निर्माण झाली असून पालिका प्रशासनाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
आनंदा किसप्पा प्रधाने हे आपल्या घरासमोरील गोठ्याच्या अंगणात झोपलेले असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या आरडाओरडीनंतर अक्काराम वावरे, गणेश आलासे यांच्यासह शेजाऱ्यांनी धाव घेत त्यांना तात्काळ उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अक्काराम वावरे यांनी दिली.
दरम्यान, याच कुत्र्याने परिसरातील चार रेडकांवरही हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. गोठणपूर हा जनावरांच्या गोठ्यांचा भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात शेळ्या, मेंढ्या व इतर पशुधन ठेवले जाते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा वाढता वावर हा पशुधनासाठी मोठा धोका ठरत आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनावर चोरीच्या घटनांमुळे अनेक पशुधन मालक गोठ्याजवळच वास्तव्यास आहेत. मात्र आता मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांवरच हल्ले होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.