हुपरी : पनवेलमधील गुप्तधन प्रकरणातील सुमारे 40 लाख रुपये किमतीचे 400 ग्रॅम सोने हुपरीतील सोने-चांदी व्यवसायिकांकडून पनवेल पोलिसांनी जप्त केले. तौफिक मुजावर (वय 45, रा. संकेश्वर, जि. बेळगाव) या भोंदूबाबाने पट्टणकोडोली (मोरे मळा) येथील अझहर मुजावर व नागाव मधील इसाक रनमल्ली या एजंटाच्या मदतीने हे सर्व सोने कमी किमतीत येथील सोने, चांदी व्यावसायिकांना विकले होते, अशी माहिती पनवेलचे सहायक पोलिस निरीक्षक आर. बी. घेवडेकर यांनी दिली. या तिघांनाही पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
दरम्यान, हे सोने खरेदी केलेल्या शहरातील सोने, चांदी व्यावसायिकांची पनवेल पोलिसांनी चार दिवसांपासून झाडाझडती घेत 400 ग्रॅम सोने जप्त केले आहे. सपोनि घेवडेकर म्हणाले, संकेश्वर नजीकच्या सोलापूरमधील तौफिक मुजावर या भोंदूबाबाने पनवेलमधील एका कुटुंबाला असलेल्या सर्व प्रकारच्या कौटुंबीक समस्या दूर करण्याबरोबरच शेतातून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी सलग चार दिवस नग्न पूजेसह विविध विधी करून शेतात मोठा खड्डाही खणला आहे. तरीही गुप्तधन मिळत नसल्याने या भोंदूबाबाने पुन्हा त्याच्याकडील सर्व सोन्याचे दागिने व रोख 5 लाख रुपये एका विधिवेळी लाल कपड्यात बांधून ठेवण्यास सांगितले होते.
विधी पूर्ण होताच या भोंदूबाबाने त्या कुटुंबाचे सुमारे 400 ग्रॅम सोने व रोख 5 लाख रुपये ठेवण्यात आलेले गाठोडे घेऊन पलायन केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या कुटुंबातील चौघांनी अन्नपाणी सोडून दिल्याने त्यांची तब्बेत खालावली होती. दरम्यानच्या कालावधीत एका नातेवाईक महिलेने हा प्रकार पनवेल पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिला होता. त्यामुळे पनवेल पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तौफिक मुजावर या भोंदूबाबाला पकडून त्याचा पर्दापाश केला. या भोंदूबाबाने या प्रकरणातील सर्व सोने पट्टणकोडोलीतील अझहर मुजावर व नागावमधील इसाक रनमल्ली या एजंटांमार्फत येथील काही धनाढ्य सराफांना अत्यंत कमी किमतीत विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
काहींनी कमी किंमतीत सोने खरेदी केले आहे तर काहींनी सोने घेऊन त्या बदल्यात सोन्याचे दागिने दिल्याची माहिती पोलिसांना दिली. काही सोने शहरातील गोल्ड लोन बँकेत ठेवून रक्कम उचल केल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. पनवेल पोलिसांनी या सराफांना दम देताच त्यांनी सोने परत केले.