तानाजी खोत
कोल्हापूर : सकाळच्या वाफाळत्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सध्या घराघरांत, कट्ट्यांवर आणि कार्यालयांमध्ये एकाच विषयाची जुगलबंदी रंगली आहे, ती म्हणजे सोन्याच्या दरातील घसरण! ‘अहो, ऐकलंत का, सोनं एका दिवसात ६ हजारांनी आणि आठवड्यात तब्बल १२ हजारांनी खाली आलंय, आताच थोडं घेऊन टाकूया...’ असा गृहिणींचा सूर, तर ‘अगं, थांब जरा, १ लाखापर्यंत खाली येतंय का बघू!’ असा पतिराजांचा सबुरीचा सल्ला, या गोड संवादांनी सध्या अवघ्या करवीरनगरीचे वातावरण ‘सुवर्णमय’ झाले आहे.
गेल्या वर्षभरात सोन्याने १ लाखाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडून थेट दीड लाखाच्या उंबरठ्यावर झेप घेतली होती. मौल्यवान धातूची ही गगनभरारी पाहून सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय गृहिणींनी सोने खरेदीचा विचार मनाच्या कप्प्यातच बंद करून ठेवला होता. मात्र शनिवारी (दि. २१) २४ कॅरेट शुद्ध सोने १ लाख २६ हजार ६९० रुपयांवर (१ लाख २३ हजार अधिक जीएसटी), तर चांदी २७,२०० रुपयांनी घसरून १ लाख ५६ हजारांवर स्थिरावताच गृहिणींच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
पुन्हा भाव वाढले तर हातातोंडाशी आलेला घास निसटून जाईल, या भीतीने घराघरांत ‘फायनान्शियल प्लॅनिंग’चे नवे फंडे काढले जात आहेत. ‘राजूभाऊंकडची जुनी देणी आजच्या आज वसूल करा’, ‘पुढच्या महिन्यात फुटणारी भिशी आताच उचलूया’, ‘बँकेतली ती छोटी एफडी मोडूया’ किंवा ‘घरातली जुनी मोड मोडून नवीन घडवूया,’ असे एकाहून एक भन्नाट पर्याय गृहिणींकडून पतिराजांसमोर ठेवले जात आहेत.
अनेकांनी तर आहे ते सोने बँकेत ठेवून कर्ज घ्यायचे आणि सोने खरेदी करण्याचा अजब तोडगा काढला आहे. ऐन लग्नसराईच्या तोंडावर झालेल्या घसरणीमुळे सराफ बाजारातील मरगळ झटकली गेली आहे. विचारणा मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरांचा आलेख आणखी खाली येतो की पुन्हा उसळी घेतो, याच्या गणितात अडकलेला सामान्य ग्राहक मात्र ‘ही सुवर्णसंधी साधायचीच’ या निर्धाराने आता गुजरीकडे पावले वळवू लागला आहे.