Gold Silver Price Drop | सोने ४, तर चांदी १४ हजारांनी घसरली 
कोल्हापूर

Gold Silver Price Drop | सोने ४, तर चांदी १४ हजारांनी घसरली

सोने १.३८ लाख रुपये तोळा, चांदी १.८१ लाख रुपये किलो

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुवर्ण-चांदी बाजारातून ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. गेल्‍या दोन दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू असून, सोन्याचा दर तोळ्‍यामागे ४ हजार, तर चांदीचा दर किलोला तब्‍बल १४ हजार रुपयांनी खाली आला. शनिवारी कोल्‍हापूरच्‍या सुवर्ण बाजारात सोने प्रतिदहा ग्रॅम १ लाख ३८ हजार रुपयांना विक्री झाले. तर, चांदीचा विक्री दर एक लाख ८१ हजार रुपयांवर आला होता.

काही महिन्‍यांपूर्वी औद्योगिक मागणी व जागतिक गुंतवणुकीमुळे चांदीचा प्रतिकिलो दर चार लाख रुपयांच्‍या पार गेला होता. त्‍याचवेळी नजीकच्‍या भविष्‍यात बाजारात करेक्शन येणार, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली जात होती; पण चांदीचे दर थेट निम्म्यावर येतील, असे ग्राहक आणि विक्रेत्‍यांना वाटले नव्हते. आता ऐन सणासुदीच्‍या उंबरठ्यावर सोने-चांदीच्‍या दरात घसरण सुरू असून, दोन दिवसांत सोन्‍याचे प्रतितोळा दर १.४२ लाखाहून १.३८ लाखावर, तर चांदीचा प्रतिकिलो दर १.९५ लाखाहून १.८१ लाखावर आला आहे. दरातील घसरणीमुळे यंदा धनत्रयोदशीला ग्राहकांना खरेदीचा आनंद लुटता येईल, असे कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापारी संघाचे भरत ओसवाल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT