कोल्हापूर, नवी दिल्ली : Gold Rate | अमेरिकन डॉलरने गटांगळी खाल्ल्यानेे आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या अनिश्चिततेमुळे दिल्लीतील सराफ बाजारात सोमवारी सोन्याच्या दराने ऐतिहासिक उसळी मारली. यामुळे सोन्याची मागणी प्रचंड वाढली. परिणामी सोन्याने प्रति 10 ग्रॅम एक लाखाच्या पुढे (जीएसटी वगळून 99,800 रुपये) भरारी मारली. कोल्हापुरात सोने दराने आजवरचे सर्व विक्रम मोडले असून सोमवारी तो 1,00,300 रु. प्रति तोळा दर झाला आहे.
मुंबईत सोने सर्वाधिक महाग झाले असून सोमवारचा दर 1,02,663 रु. 10 ग्रॅम (जीएसटीसह) असा होता. तर नाशिकमध्ये 1,00,700 रुपये (जीएसटीसह) होता.जूनपर्यंत सोन्याचा दर एक लाख 5 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज सराफ व्यापारी व्यक्त करत आहेत. अमेरिकेने दोन एप्रिल रोजी टॅरिफ शुल्क वाढवल्यानंतर सोन्याच्या दरात 6 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये जून डिलिव्हरीसाठी सोन्याचे फ्युचर्स 1621 रुपयांनी म्हणजेच 1.7 टक्क्यांनी वाढून 96,875 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 3,397.18 डॉलर प्रति औंसच्या उच्चांकावर पोहोचले. परंतु नंतर ते 3,393.49 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होते. जागतिक स्तरावर सोन्याचे फ्युचर्स प्रथमच 3,400 डॉलर प्रति औंसच्यापुढे गेले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या टॅरिफ शुल्क प्रकरणातील अनिश्चितता, अमेरिकन डॉलरची कमजोरी यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आगामी सणासुदीच्या मागणीमुळे सोन्याच्या दरात आणखी वाढ शक्य आहे. अमेरिकन डॉलर तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांना पदावरून दूर करण्याची धमकी दिल्यानंतर गुंतवणूकदारांनी सोने खरेदीचा सपाटा लावला आहे.
सोलापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यांची मागणी वाढली आहे. भाव एक लाखाच्या पुढे गेल्याने सोने मोडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सराफ व्यापार्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयांचे झालेले अवमूल्यन, भारताच्या खरेदीवर लावलेले कर, चीन अमेरिकामध्ये चालू असलेल्या आर्थिक युध्दाचे परिणाम भारतातील सोन्याच्या बाजारपेठेवर झाले आहेत. गुुडीपाडव्यापासून सोन्याची दरवाढ कायम आहे. सोमवारी (दि. 21) सोन्याचा तोरा एकदम वाढत एक लाख रूपये प्रति तोळा झाला. परिस्थीती अशीच राहिली तर एक लाख 20 हजारांच्या आसपास भाव जाण्याची शक्यता सराफ व्यापार्यांनी बोलून दाखवली. मोठ्या प्रमाणात दरवाढ होऊनही सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. दरवाढीचा कोणताही परिणाम व्यापार्यांवर झाला नाही. लग्नसराईचा हंगाम चालू असल्याने आपल्या बजेटनुसार सोने खरेदी करत आहेत. दररोज सोन्याच्या भावामध्ये वाढच होत असल्याचे सराफ व्यापारी हरिष करजगीकर यांनी दिली.
99.9 टक्के शुद्धतेचे सोने : 1650 रु.ने वाढून 99,800 रु. प्रति 10 ग्रॅम झाले.
99.5 टक्के शुद्धतेचे सोने : 1600 रु.ने वाढून 99,300 रु. प्रति 10 ग्रॅम झाले.
31 डिसेंबरच्या तुलनेत प्रति 10 ग्रॅमसाठी 20,850 रुपयांची वाढ झाली आहे.
चांदीच्या दरातही 500 रुपयांची वाढ झाली असून ते 98,500 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.
कारणे : अमेरिकन टॅरिफ वॉर, व्याज दर कपातीची शक्यता, भू-राजकीय अनिश्चितता, अमेरिकन डॉलरची कमजोरी.
वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दर 80 हजाराच्या आसपास होते. त्यावेळी दिवाळीपर्यंत सोने 95 हजारपर्यंत जाईल, असा अंदाज वाटत होता. पण नंतरच्या काळात प्रचंड दरवाढ होत गेली आणि सुरुवातीचे सर्वच अंदाज खोटे ठरले आहेत. आता लग्नसराईसाठी आवश्यक खरेदी होत आहे. गुंतवणुकीसाठी खरेदी कमी झाली आहे.भरत ओसवाल, कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापारी संघ