कोडोली : वाडी रत्नागिरी येथे जोतिबा चैत्र यात्रेमध्ये झालेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी 17 लाख 20 हजार रुपयांच्या सहाजणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हातोहात लंपास केल्या. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, प्रवीण ऊर्फ पवन अनिल जाधव (वय 24, रा. पोखरमोह, ता. शिरूर), नागेश जवाहरलाल देवकते (37, रा. सरगम चौक, पंढरपूर) या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
जोतिबा डोंगर येथे बुधवारी चैत्र यात्रेचा दिवस असल्याने जोतिबा मंदिर ते यमाई मंदिरदरम्यान भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेऊन अक्षय कृष्णात खाडे (रा. जठारवाडी, ता. करवीर) यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन (1 लाख 20 हजार), रवींद्र राजाराम धडेल (रा. पन्हाळा) यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन (2 लाख 40 हजार), सौरभ कांबळे (रा. ढवळेश्वर, ता. खानापूर) यांच्या गळ्यातील सव्वा दोन तोळ्याची सोन्याची चैन (3 लाख रुपये), आकाश विठ्ठल माने (रा. भिलवडी, जि. सांगली) यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन (2 लाख 50 हजार), प्रदीपकुमार लालजी मालवीय (रा. आर. के. नगर, कोल्हापूर) यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन (2 लाख 30 हजार), स्वरूप प्रदीप शेटे (रा. सागाव, जि. सांगली) यांच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चेन (6 लाख रुपये) असा एकूण 17 लाख वीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हातोहात लंपास केले. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे.
चोरट्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी
मुख्य यात्रेच्या आदल्या दिवशी रोहित बुचडे (रा. कोल्हापूर) हे जोतिबा दर्शनासाठी आले होते. यावेळी जोतिबा मंदिराजवळ गर्दीचा फायदा घेत गळ्यातील चेन हिसडा मारून चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी दि. 2 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने प्रवीण ऊर्फ पवन जाधव व नागेश देवकते या चोरट्यांना पकडले. त्यांच्याकडून चोरी केलेली 1 लाख 30 हजार किमतीची 11 ग्रॅम सोन्याची चेन पोलिसांनी हस्तगत केली आहे. दोन्ही चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.