कोल्हापूर : भाऊसिंगजी रोडवर दोन भामट्यांनी 18 वर्षीय कारागिराला बोलण्यात गुंतवून संमोहित करून सुमारे 30 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास करून काही मिनिटांत पोबारा केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास गोल्ड सिल्व्हर पॅलेसजवळ घडली.
समीर सुधीर पात्रा (वय 48) बंगाली कारागीर आहेत. गुरुवारी सायंकाळी त्यांचा मुलगा सुबोधित समीर पात्रा (18) हा गुजरीत तयार दागिने पोहोच करण्यासाठी निघाला होता. भाऊसिंगजी रोडवरील गणपती मंदिराजवळ अनोळखी व्यक्तीने त्याला अडवले. तो बंगाली भाषेत बोलत असल्याने सुबोधितही बोलू लागला. त्याचा दुसरा साथीदार तिथे आला. दोघांनी सुबोधितला बोलण्यात गुंतवले. एका भामट्याने खिशातून वस्तू काढून त्याच्या हातावर ठेवली. त्यानंतर सुबोधितने स्वतःहून सोन्याचे दागिने असलेली बॅग त्या दोघांना दिली. बॅग मिळताच दोघांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली.
व्यावसायिकांमध्ये भीती
गजबजलेल्या भाऊसिंगजी रोड परिसरात भरदिवसा चोरट्यांनी 30 तोळे सोन्याची बॅग लंपास केल्याने गुजरी हादरून गेली आहे. यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.