कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेच्या लाटेनंतर आज सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. बुधवारी (दि. 21) ऐतिहासिक उच्चांक गाठणार्या या मौल्यवान धातूंनी आज अचानक ‘यू टर्न’ घेतल्याने सराफ बाजारात खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड प्रकरणी युरोपीय देशांवरील शुल्काबाबत नरमाईचे संकेत दिल्याने भू-राजकीय तणाव निवळला असून, त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे.
गुरुवारी (दि. 22) सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 3,500 रुपयांची घट होऊन तो एक लाख 55 हजार 500 रुपयांवर खाली आला आहे. चांदीने तर मोठी गटांगळी खाल्ली असून एकाच दिवसात किलोमागे तब्बल 25 हजार रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे चांदीचा दर आता तीन लाख 10 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. हे सर्व दर जीएसटीसह असून दर कमी होऊनही चांदी दर तीन लाखांच्या पुढे आणि सोने दर दीड लाखांच्या पुढेच आहेत.