kolhapur | जि.प. निवडीत ‘गोकुळ’ची छुपी रणनीती; राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | जि.प. निवडीत ‘गोकुळ’ची छुपी रणनीती; राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

महायुती-आघाडी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘तडजोडी’चे राजकारण

पुढारी वृत्तसेवा

डॅनियल काळे

कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत वरकरणी शांत दिसणार्‍या प्रक्रियेच्या आड आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची तीव— राजकीय रणनीती लपलेली असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट संघर्ष असताना, गोकुळच्या बाबतीत मात्र वेगळीच ‘आतील खेळी’ सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

पूर्वी जिल्हा राजकारण आणि गोकुळवरील प्रभाव माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाकडे होता. मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या जोडगोळीने तालुका पातळीवर नेत्यांची मजबूत मोट बांधत गोकुळ ताब्यात घेतले. आता मात्र राजकीय चित्र बदलले आहे. माजी आमदार महादेव महाडिक यांचे पुत्र आमदार अमल, सून शौमिक आणि पुतण्या खासदार धनंजय महाडिक हे महायुतीचे नेते आहेत. महाडिकांना गोकुळवर पुन्हा वर्चस्व आणायचे आहेत. मुश्रीफ महायुतीत आहेत, तर सतेज पाटील महाविकास आघाडीत आहेत. तरीही सहकार क्षेत्रात मुश्रीफ-सतेज पाटील ही दोन्ही नेतेमंडळी एकत्रित भूमिका घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुश्रीफ गोकुळ निवडणूक महायुतीच्या बॅनरखाली लढवण्याचे संकेत देत असले, तरी सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत चार पावले मागे घेत गोकुळसाठी वेगळी रणनीती आखल्याचे दिसते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत त्यांनी माघार घेऊन बिनविरोध निवडीला मदत केली, हीच गोकुळ निवडणुकीसाठीची ‘सेफ खेळी’ मानली जात आहे.

कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूध संघाला प्रचंड महत्त्व आहे. ‘आमदारकी नको, पण गोकुळची सत्ता हवी’, असे स्पष्टपणे बोलले जाते. कारण गोकुळ ही केवळ सहकारी संस्था नसून जिल्ह्याच्या राजकारणाचा तो आर्थिक कणा मानला जातो. त्यामुळे या निवडणुकीसाठी इतर सत्तास्थाने सोडण्याची तयारी काही नेत्यांनी दाखवली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून शैलजा सतीश पाटील (गिजवणेकर) यांचे नाव आघाडीवर होते. मात्र गोकुळच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करत त्यांनी या पदासाठी फारशी उत्सुकता दाखवली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT