कोल्हापूर : कोजागरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीचा नवा विक्रम ‘गोकुळ’ने केला आहे. सोमवारी एका दिवसात 20 लाख 28 हजार 526 लिटर दूध विक्री करत उच्चांकी कामगिरी केली आहे. गेल्यावर्षी कोजागरी पौर्णिमेदिवशी 18 लाख 64 हजार 759 लिटर इतकी दूध विक्री झाली होती. यावर्षीच्या विक्रीत 1 लाख 63 हजार 767 लिटरने वाढ झाली आहे.
गोकुळने दूध संकलन आणि विक्री दोन्ही क्षेत्रांत सातत्याने चढता आलेख राखला असून, गुणवत्ता व ग्राहकांचा विश्वास यामुळे गोकुळने नवनवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत. या विक्रमी विक्रीत मार्केटिंग विभागाने प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी केली आहे. डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील व त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे विक्रीचा नवा उच्चांक करता आला. गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास हाच गोकुळच्या प्रगतीचा पाया आहे. भविष्यात दररोज 20 लाख लिटर दूध विक्रीचे उद्दिष्ट ठेवून आमची वाटचाल सुरू असल्याचे गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी सांगितले.