Gokul Election | ‘गोकुळ’ जागावाटपात महायुतीत कोण मोठा भाऊ? 
कोल्हापूर

Gokul Election | ‘गोकुळ’ जागावाटपात महायुतीत कोण मोठा भाऊ?

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : गोकुळ दूध संघाच्‍या निवडणुकीत नेत्‍यांचा आता जागा वाटपात कस लागणार आहे. महायुती म्‍हणून पॅनेल झाल्‍यास राष्‍ट्रवादी, भाजप आणि शिवसेना सर्वाधिक जागांसाठी आग्रही राहणार आहेत. त्‍यामुळे महायुतीत जागा वाटपात कोण ठरणार मोठा भाऊ, हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे. निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा निर्माण होणार हे नक्‍की आहे. त्‍यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक झाल्‍यास महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा मुख्‍यमंत्र्यांसमोरच सुटणार आहे.

गोकुळचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. मंगळवारपासून (दि. १५) उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यासाठी इच्‍छुकांनी अगोदरच सर्व कागदपत्रे गोळा करून तयारी केली आहे. त्‍यामुळे उमेदवारी अर्जही मोठ्या संख्‍येने येण्‍याची शक्‍यता आहे.

विद्यमान संचालकांनाच संधी?

निवडणुकीसाठी गोकुळच्‍या विद्यमान संचालक मंडळातील बहुतांश संचालकांना पुन्‍हा संधी मिळण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे महायुतीची उमेदवारी मिळविताना इच्‍छुकांना प्रचंड फिल्डिंग लावावी लागणार आहे. दुसरीकडे आ. सतेज पाटील यांच्‍या समविचारी आघाडीकडे उमेदवारी सहज उपलब्‍ध होईल असे चित्र आहे.

राष्ट्रवादी-शिवसेनेसाठी जमेची बाजू

गोकुळच्या मतदार यादीत अवसायनातील सुमारे १४०० संस्थांचा समावेश झाला. यामध्ये बहुतांश संस्था राष्ट्रवादी व शिवसेनेशी संबंधित आहेत. या संस्थांचा समावेश दोन्ही पक्षांसाठी जमेची बाजू ठरणार आहे.

'बिनविरोध'ची शक्‍यता धूसर

गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा असली तरी ही शक्‍यता फार धूसर आहे. अगोदरच जागावाटपावरून महायुतीत चढाओढ आहे. त्‍यात बिनविरोध करायची झाल्‍यास आ. सतेज पाटील यांनाही जागा द्यावा लागतील. त्‍यामुळे बिनविरोधसाठी जागावाटपावर नेत्‍यांचे एकमत होईल, असे वाटत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT