Gokul Election File Photo
कोल्हापूर

Gokul election | गोकुळच्या ठरावावरून ग्रामीण राजकारणाला उकळी

सहायक दुग्ध निबंधक कार्यालयात तक्रारी वाढल्या

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून सोमवारपासून सभासद दूध संस्थांकडून ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. मात्र, ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले असून ठरावाच्या मुद्द्यावरून संस्थांतर्गत गटबाजीला उकळी आली आहे.

ठराव कोणाच्या नावे द्यायचा, यावरून दूध संस्था संचालक मंडळ आणि सभासद यांच्यात तीव्र मतभेद निर्माण होत असून काही ठिकाणी तर वादावादीही होत आहे. बहुतेक ठिकाणी दूध संस्थांच्या संचालक मंडळात या ठरावावरून थेट ‘दुफळी’ पडल्याने दोन वेगवेगळ्या गटांच्या नेत्यांमध्ये विभागले गेल्याने पेच निर्माण झाला आहे. याचे पर्यवसान कुरघोडीच्या राजकारणातून सहायक दुग्ध निबंधक कार्यालयाकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे.

संस्थेचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असणे, दूध बिल वेळेत न मिळणे, संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी, अपात्रतेची भीती आणि थकबाकी वसुली हे मुद्दे आता तक्रार करण्यासाठी कळीचे झाले आहेत. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संस्थांना निवडणूक खर्चाचा ठरावीक रकमेचा धनादेश द्यावा लागतो. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून जिल्ह्यातील सुमारे दीडशेहून अधिक संस्थांनी ही रक्कम थकवली होती. नोटिसा देऊनही दुर्लक्ष करणार्‍या या संस्था आता निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झाल्या आहेत. याचे कारण थकबाकीमुळे संस्था अपात्र ठरू नये, मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये यासाठी संस्था स्वतःहून थकबाकीची रक्कम जमा करत आहेत.

प्रारुप मतदार यादी

सहायक निबंधक दुग्ध कार्यालयाने प्रारुप मतदार यादीची छाननी पूर्ण केली आहे. सोमवार (दि. 9) पासून ठराव गोळा करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गावागावातील राजकीय ईर्ष्या आणखी टोकाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT