Gokul Election | ‘गोकुळ’ची ४,८९७ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध 
कोल्हापूर

Gokul Election | ‘गोकुळ’ची ४,८९७ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध

सहायक निबंधक कार्यालय, ‘गोकुळ’ कार्यालय येथे यादी पाहण्यास उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीसाठी बुधवारी ४ हजार ८९७ मतदारांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांनी सकाळी ११ वाजता यादी प्रसिद्ध केली. ताराबाई पार्क येथील सहायक निबंधक कार्यालय, ‘गोकुळ’ कार्यालयात यादी पाहण्यास उपलब्ध आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी विभागीय उपनिबंधक मिसाळ यांना प्रारूप मतदारयादी तत्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मिसाळ यांनी बुधवारी ती प्रसिद्ध केली. सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी सादर केलेल्या ५,४३९ ठरावांपैकी ४,८९७ संस्था सभासदांचा यादीमध्ये समावेश आहे.

यादीतून ५४२ संस्था वगळल्या

‘गोकुळ’ने सहायक निबंधक कार्यालयाकडे ५,४७० सभासदांची यादी सादर केली होती. यापैकी ६४४ संस्था अवसायनात काढल्या होत्या. त्यानुसार ४,८४४ संस्था यादीमध्ये शिल्लक राहिल्या होत्या. ठराव मागविण्याच्या प्रक्रियेत ५,४३९ ठराव सहायक निबंधक कार्यालयाकडे दाखल झाले होते. या सर्व ठरावांची यादी मिसाळ यांच्याकडे सादर केली होती. यादीतून ५४२ ठराव वगळून ४,८९७ संस्थांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली आहे.

‘गोकुळ’च्या १९४ दूध संस्‍थांचा अवसायनाचा आदेश रद्द

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्‍न १९४ दूध संस्‍थांचा सहायक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांनी अवसायनाचा अंतिम केलेला आदेश बुधवारी मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या कोल्‍हापूर सर्किट बेंचने रद्दबातल ठरवला. न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांनी यासंदर्भातील आदेश दिला. न्‍यायालयाच्‍या निर्णयामुळे संबंधित दूध संस्‍थांना दिलासा मिळाला असून, त्‍यांचा ‘गोकुळ’च्‍या मतदारयादीत समावेश होण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT