कोल्हापूर : ‘गोकुळ’ने म्हैस दूध खरेदी दरात प्रति लिटर दीड रुपये तर गाय दूध खरेदी दरात एक रुपया दरवाढ केली आहे. ही दरवाढ मंगळवार, दि. ११ पासून लागू होईल. म्हैस दूध विक्री दरातही प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली आहे. गाय दुधाच्या विक्री दरात वाढ केलेली नाही. प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला, अशी माहिती प्रशासक प्रदीप मालगावे यांनी दिली.
गोकुळ संलग्न ७५०० दूध संस्थांच्या माध्यमातून प्रतिदिन १४ ते १५ लाख लिटर दूध संकलन केले जाते. यंदा पावसाळा लांबला असून अनेक भागात कमी-जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे ओल्या चार्याची कमतरता निर्माण झाल्याने याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला. याचा आर्थिक फटका शेतकर्यांना बसत असल्याने खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय गोकुळने घेतला आहे. विक्री दरातील वाढ ही कोल्हापूरसह पुणे, मुंबईसाठीही लागू असणार आहे.