कोल्हापूर : ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर गुरुवारी (दि. 22) होणार्या संचालक मंडळाच्या सभेत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. सर्व नेत्यांनी एकमताने शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावाला नवे अध्यक्ष म्हणून पसंती दिली आहे. अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नेत्यांच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
नेहमी ठरल्याप्रमाणे सहज सोपा सत्ताबदल होणार्या ‘गोकुळ’मध्ये पहिल्यांदाच ठरलेल्या मुदतीत राजीनामा न देण्याच्या डोंगळे यांच्या भूमिकेने राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये डोंगळे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार केला. ‘गोकुळ’मध्ये महाविकास आघाडीची सत्ता असतानाही हे घडले होते. मात्र, नेत्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आणि ठरल्यानुसार डोंगळे यांचा राजीनामा गृहीत धरला.
मात्र, या सगळ्या प्रकारात डोंगळे महायुतीच्या नेत्यांच्या जवळ पोहोचले होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याशिवाय आणि महायुतीचाच अध्यक्ष होतो हे निश्चित झाल्याशिवाय राजीनामा देणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर डोंगळे यांनी राजीनामा दिला. त्यावर उद्या, गुरुवारी (दि. 22) होणार्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. डोंगळे यांचा राजीनामा मंजूर झाल्याचा ठराव व पत्र सहकार उपनिबंधक दुग्ध यांच्याकडे पाठविले जाईल. त्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. या महिनाअखेरीस निवडणूक व्हावी आणि जास्त दिवस लागून त्याला फाटे फुटू नयेत, यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर झाल्यानंतर नेत्यांच्या बैठकीत नव्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव सर्वसंमतीचे उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले आहे.
गुरुवारी संचालक मंडळाची सभा गोकुळ शिरगाव येथे ‘गोकुळ’च्या मुख्यालयात होणार आहे. त्यापूर्वी ताराबाई पार्क येथील कार्यालयात सर्व संचालक एकत्र येतील. तेथे पार्टी मिटिंग होईल. त्यानंतर सगळेजण या सभेसाठी रवाना होतील. यातून नेत्यांना ‘हम सब एक है’ असा संदेश द्यायचा आहे.