Mandlik Political Strategy | 'गोकुळ'च्या सत्तासंघर्षातून मंडलिकांकडून चाचपणी? file photo
कोल्हापूर

Mandlik Political Strategy | 'गोकुळ'च्या सत्तासंघर्षातून मंडलिकांकडून चाचपणी?

पुढारी वृत्तसेवा

प्रकाश कारंडे

बिद्री : कागल तालुक्यातील माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांना काँग्रेसमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन वरवरचा अंदाज घेतल्या‍ची चर्चा आहे. 'गोकुळ' अध्यक्ष निवडीवरून झालेला पेच सोडवण्यासाठी या सगळ्या हालचाली सुरू असल्याचे समजते. प्रा. मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक हे ‘गोकुळ’मध्ये महायुतीतून विजयी झाले आहेत.

आ. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे 'गोकुळ'मध्ये १३ संचालक, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले. साहजिकच सतेज पाटील यांना एका संचालकाची गरज आहे. त्यासाठी वीरेंद्र मंडलिक यांच्या नावाची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. भविष्यात त्यांना 'गोकुळ'मध्ये चांगले पद मिळेल, अशा आशयाच्या चर्चाही रंगल्या आहेत. 'गोकुळ'चा पेच सोडवायचा असेल आणि प्रा. मंडलिक यांना भविष्यातील राजकारणासाठी काँग्रेस हाच बेस्ट पर्याय ठरू शकतो, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.

वीरेंद्र मंडलिक यांनासुद्धा विधानसभेच्या दृष्टीने हा पर्याय ठरेल, असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे खासगीतील म्हणणे आहे. प्रा. मंडलिक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. सध्या ते महायुतीत असले, तरी भविष्‍यातील राजकीय घडामोडींवर सोशल मीडियावर जोरदार‍ चर्चा सुरू आहे. भाजपचे समरजित घाटगे सध्या जिल्ह्यात भेटीगाठी व काही उपक्रम घेत असल्यामुळे ते लोकसभेची निवडणूक लढवतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे प्रा. मंडलिक यांच्‍याकडून चाचपणी सुरू असल्‍याचे बोलले जाते.

आता लक्ष २०२९...

गोकुळचे संचालक वीरेंद्र मंडलिक यांच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये 'गोकुळ'मधील मागील निवडणुकीचा वचपा आता निघाला आहे. आता लक्ष विधानसभा २०२९... अशा आशयाची ती पोस्ट आहे. या पोस्टचीही जाेरदार चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT