Gokul Election | ‘गोकुळ’च्‍या सत्तेसाठी लागणार २,७०० मते 
कोल्हापूर

Gokul Election | ‘गोकुळ’च्‍या सत्तेसाठी लागणार २,७०० मते

आजी-माजी संचालकांकडून मतांची बेगमी सुरू; संपर्क दौरे, गाठी-भेटींवर जोर

पुढारी वृत्तसेवा

धीरज बरगे

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या सत्तेपर्यंत पोहोचण्‍यासाठी २,७०० मते लागणार आहेत. आजी-माजी संचालकांकडून इतक्‍या मतांची बेगमी करण्‍यास सुरुवात झाली आहे. यासाठी संपर्क दौरे, ठरावधारकांच्‍या गाठीभेटी घेण्‍याचा जोर वाढला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यास सुरुवात झाल्‍यानंतर ‘गोकुळ’चे राजकारण चांगलेच तापणार आहे.

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी ५,४७० संस्‍था सभासदांची यादी सहायक निबंधक कार्यालयाकडे ‘गोकुळ’ने सादर केली होती. यापैकी ५,३८० संस्‍थांचा अंतिम मतदार यादीत समावेश आहे. त्‍यामुळे ‘गोकुळ’मध्‍ये विजय मिळविण्‍यासाठी प्रत्‍येक संचालकाला २,७०० मतांचा आकडा गाठावा लागणार आहे. त्‍यामुळे २,७०० मतांची जुळवाजुळव सुरू असून इतकी मते कशी मिळतील, याचीही गणिते आजी-माजी संचालकांसह इच्‍छुकांकडून मांडली जात आहेत.

पॅनेलची रचना ठरवणार निवडणुकीचा कल

‘गोकुळ’ची निवडणूक महायुती विरुद्ध आ. सतेज पाटील यांची राजर्षी शाहू समविचारी आघाडी अशी होईल, असे सध्‍या तरी चित्र आहे. मात्र, अवसायनातील १,४०० दूध संस्‍थांनी राष्‍ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्‍यच्‍या जिल्‍ह्यातील नेत्‍यांना अदृश्‍य शक्‍तीबाबत इशारा दिला आहे. त्‍यामुळे महायुती म्‍हणून पॅनेल करायचे झाल्‍यास काहीही करून अदृश्‍य शक्‍तीला या नेत्‍यांना सोबत घ्‍यावेच लागेल. त्‍यामुळे एकगठ्ठा मतदान तयार केलेल्‍या १,४०० दूध संस्‍थांचा इशारा, राजकीय दबाव यामधून ‘गोकुळ’ निवडणुकीत कशा पद्धतीने पॅनेल होणार, याकडे लक्ष असणार आहे. पॅनेलच्‍या रचनेनंतरच निवडणुकीचा कल स्‍पष्‍ट होणार आहे.

एकगठ्ठा मतदान कोणाला मिळणार?

अवसायनातील बहुतांश दूध संस्‍थांचा मतदार यादीत समावेश झाल्‍याने या संस्‍थांनी मेळावा घेत निवडणुकीत अदृश्‍य शक्‍तीला सोबत घेतला तर आम्‍ही तुमच्‍या सोबत नाही, असा थेट इशाराच आपल्‍या नेत्‍यांना दिला आहे. त्‍यामुळे या १,४०० संस्‍थांचा एकगठ्ठा मतदान कोणाला मिळणार आणि कोणाची अडचण करणार, हे पुढील काळात स्‍पष्‍ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT