कोल्हापूर : "लहान मुलाला खेळणं मिळालं नाही की जसा तो हातपाय आपटून त्रागा करतो, आईला बोचकारतो; तसाच त्रागा गेले पंधरा दिवस गोकुळच्या अध्यक्षपदावरून सुरू आहे. 'बंटी साहेब' म्हणून सन्मान द्यायचा प्रयत्न केला, पण ते अजून 'बंटीच' राहिले," अशा अत्यंत तिखट शब्दांत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्या कार्यशैलीवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, “मी धनंजय महाडिकांना ‘मुन्ना साहेब’ आणि विरोधक असूनही बंटी पाटलांना ‘साहेब’ म्हणण्याचा आग्रह धरत होतो. मात्र, या १५ दिवसांत त्यांनी सिद्ध केले की ते अजूनही ‘बंटीच’ राहिले, ‘बंटी साहेब’ झाले नाहीत. एखादी गोष्ट मिळाली नाही की लहान मूल आईला बोचकारते, तशीच यांची अवस्था झाली आहे. गोकुळचे नाव २१२ देशांत पोहोचले; पण ते चांगल्या कारणासाठी पोहोचायला हवे होते, शिव्याशाप देऊन नाही. महाविकास आघाडी म्हणजे केवळ ‘बंटी पाटील’ अशी अवस्था असून तिथे उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी कुठेही सोबत दिसत नाही,’’ असा टोलाही त्यांनी लगावला.
महायुतीवर लोकशाही पायदळी तुडवल्याचा आरोप करणाऱ्यांना उत्तर देताना पाटील यांनी इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीचा पाढा वाचला. ते म्हणाले, “आम्ही गोकुळवर प्रशासक येऊ नये आणि पुन्हा निवडणूक लागू नये म्हणून नियमानुसार अध्यादेश काढला, ज्याला न्यायालयानेही मान्यता दिली. पण घटना पायदळी कुणी तुडवली? इंदिरा गांधींनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्वतःची खासदारकी आणि पंतप्रधानपद वाचवण्यासाठी देशभरातील २० लाख लोकांना तुरुंगात डांबले. माझी दिवंगत पत्नी विद्या ठाकूर केवळ आठवीत असताना तिचे आई, वडील, बहीण, भाऊ असे चारही जण १९ महिने तुरुंगात होते. आठवीतली मुलगी बिनखांबी गणेश मंदिराजवळ ठाकूर कंपनीचे दुकान चालवत आंदोलकांच्या घरी डबे पोहोचवत होती. अशी दडपशाही करणाऱ्या काँग्रेसने आम्हाला घटना आणि लोकशाही शिकवू नये,” असा घणाघात केला.
२०१९ मधील महाविकास आघाडीच्या स्थापनेवर बोलताना मंत्री चंद्रकांत पाटलांनी गंभीर दावा केला. ‘‘२०१९ मध्ये १६१ आमदारांचा महायुतीचा जनादेश चोरून तुम्ही शिवसेनेला सोबत घेत सरकार स्थापन केले. त्या वेळी सतेज पाटील आमदारांना घेऊन जयपूरला लपून बसले होते. कोल्हापुरातील सोनिया गांधींच्या एका अत्यंत जवळच्या नेत्याच्या समोर स्पीकर फोनवर चर्चा झाली होती. 'कोल्हापूरचे बंटी मला धमकावत आहेत की, शिवसेना-राष्ट्रवादीसोबत गेला नाहीत तर ४० जणांचा वेगळा गट करू,’’ असे सोनिया गांधी त्या वेळी म्हणाल्या होत्या. जनादेश पायदळी तुडवून तुम्ही सत्तेवर आलात आणि आता आम्हाला लोकशाही शिकवता?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सतेज पाटलांच्या आर्थिक स्थितीवर आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेवर बोट ठेवत ते म्हणाले, ‘‘आमच्यावर बोलताना जरा विचार करा. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारायचे नसतात. तुमचे वडील शहरात स्कूटरवरून फिरायचे, आज तुमच्याकडे एवढी अफाट संपत्ती कुठून आली? ती जाहीर करा. डी. वाय. पाटील यांच्यानंतर आता गोकुळवर सतेज पाटलांचे नाव लावायचे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पाहायचे, हा यांचा डाव आहे. पण मुख्यमंत्री होण्यासाठी तेवढी वैचारिक प्रगल्भता लागते.’’
अंधारात जाऊन सरकारकडून कामे करून घ्यायची आणि उजेडात पातळी सोडून बोलायचे, ही दुटप्पी वृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम भरताना पाटील म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस हे तेल लावलेले पैलवान आहेत, ते कुणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत. फडणवीसांनी एकदा डोळे वटारले किंवा शिक्षण मंत्री म्हणून मी पाऊल उचलले, तर तुमचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल. हिंमत असेल तर यापुढे कामांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊ नका, राहुल गांधींकडून कामे करून दाखवा. मुंगी होऊन साखर खायची असते, फार त्रागा केला तर जनताच जागा दाखवून देईल.’’
गोकुळमध्ये निवडून येणारे महायुतीचे संचालक केवळ आणि केवळ सव्वापाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, जास्तीचा दर, जनावरांना योग्य चारा आणि आरोग्य सुविधा देण्यासाठीच काम करतील, अशी ग्वाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.