Kolhapur Gokul Election | प्रशासकांची नोटीस; ‘गोकुळ’चे राजकारण पुन्‍हा तापणार? 
कोल्हापूर

Kolhapur Gokul Election | प्रशासकांची नोटीस; ‘गोकुळ’चे राजकारण पुन्‍हा तापणार?

सभासदत्व रद्दच्‍या कार्यवाहीवरून महायुतीमध्‍ये तणाव

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : सभासदत्व रद्द करण्‍याच्‍या मुद्यावरून प्रशासकांनी ४१० दूध संस्‍थांना पाठविलेल्‍या नोटिसीवरून गोकुळचे काहीसे शांत झालेले राजकीय वातावरण पुन्‍हा तापण्‍याची शक्‍यता आहे. यामधून महायुतीमध्‍येच तणाव निर्माण होणार आहे. राष्‍ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्‍यच्‍या माजी संचालकांनी ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्‍याचा आरोप गुरुवारी (दि.१६) प्रसिध्‍दी पत्रकातून केला. त्‍यामुळे गोकुळवरून महायुतीमध्‍ये पुन्‍हा वादाची ठिणगी पडण्‍याची चिन्‍हे आहेत.

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळची निवडणूक महायुतीविरुध्‍द आमदार सतेज पाटील यांच्‍या समविचारी आघाडीमध्‍ये होणार असे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, निवडणुकीत विरोधक असणारी समविचारी आघाडी बाजूलाच राहिली असून, महायुतीमध्‍येच गोकुळमधील वर्चस्‍व वादातून वारंवार खटके उडत आहेत.

चंदगडचे भाजपला पाठींबा दिलेले आ. शिवाजी पाटील यांचे कार्यकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी अवसायन प्रक्रियेचा मंत्र्यांनी रद्द‍ केलेला आदेश, अवसायनातील दूध संस्‍थांच्‍या निकालावर घेतलेला आक्षेप आणि २०२१ नंतर नोंदणी झालेल्‍या संस्‍थांची चौकशी करण्याची केलेली तक्रार यावरून गेल्‍या पाच महिन्‍यांपासून गोकुळचे राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमधीलच नेत्‍यांमध्‍ये सुरू असणारा वाद मुख्‍यमंत्र्यांपर्यंत पोहोचला. मुख्‍यमंत्र्यांनी जिल्‍ह्यातील नेत्‍यांना सूचना केल्‍यानंतर वाद काहीसा निवळला होता. मात्र, आता या ४१० संस्‍थांवरून पुन्‍हा वाद पेटण्‍याची शक्‍यता आहे.

संस्‍थांचा राजकीय बळी का? संचालकांच्‍या मनमानीची शिक्षा

४१० दूध संस्‍थांकडून मागील तीन वर्षांत गोकुळला साडेचार कोटी लिटर दूध पुरवठा गोकुळला झाला आहे. दूध पुरवठा सुरू असूनही संस्‍थांचे सभासदत्व रद्द केले जाणार असले तर हा संस्‍थांचा राजकीय बळी आहे का? तसेच गोकुळने संचालकांच्‍या सांगण्‍यावरून नियमावली न पाहता संबंधित संस्‍थांना सभासदत्व दिले का? सचालकांच्‍या मनमानीची शिक्षा दूध संस्‍थांना मिळाली का, असाही प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT