कोल्हापूर : 'गोकुळ'च्या राजकारणात आता नवा आणि मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीदरम्यान, ‘राजीनामा देऊ नका’ अशा सुचना मुख्यमंत्र्यांकडून डोंगळे यांना देण्यात आल्याचे वृत्त पुढारी न्युजने दिले आहे.
डोंगळे यांचा अध्यक्षपदाचा दोन वर्षांचा कार्यकाल संपला आहे. नियमानुसार, ते राजीनामा देतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर आता परिस्थिती पूर्णतः बदलल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाच्या आजच्या (दि. १५) बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गोकुळवर सध्या मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची सत्ता आहे. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर डोंगळे भूमिका बदलणार का? ठरल्याप्रमाणे ते राजीनामा देणार की सत्तास्थितीतच राहतील? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.