कोल्हापूर : गोकुळने यंदाही दूध उत्पादक शेतकर्यांसाठी उच्चांकी अंतिम दूध दर फरक जाहीर केला आहे. 136 कोटी 3 लाख इतकी रक्कम बुधवारी (दि.1) जमा होणार असून याचा लाभ जिल्ह्यातील पाच लाख शेतकर्यांना मिळणार आहे, अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
एक एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत पुरवठा केलेल्या दुधासाठी हा दर फरक दिला जाणार आहे. म्हैस दुधासाठी सरासरी प्रति लिटर 2 रुपये 45 पैसे तर गाय दुधासाठी सरासरी 1 रुपये 45 पैसे दर फरक मिळणार आहे. दूध संस्थांना प्रति लिटर 1 रुपये 25 पैसे याप्रमाणे डिबेंचर्स दिले जाणार आहेत. हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केलेला जादा दर फरक प्रतिलिटर 20 पैसे यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
यावर्षी गोकुळने म्हैस दुधाकरिता 66 कोटी 37 लाख 70 हजार, गाय दुधाकरीता 45 कोटी 14 लाख 8 हजार इतका दूध दर फरक व फरकावर 6 टक्केप्रमाणे होणारे व्याज 5 कोटी 52 लाख 89 हजार व डिंबेचर व्याज 7.80 टक्केप्रमाणे 10 कोटी 67 लाख 35 हजार रुपये, शेअर्स भांडवलावर 11 टक्के प्रमाणे डिव्हिडंड 8 कोटी 38 लाख 69 हजार रुपये असे 136 कोटी 3 लाख दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे. गोकुळकडून दूध उत्पादक सभासदांना दसरा-दिवाळीची ही भेट असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले उपस्थित होते.
आईस्क्रीम, चीज, अंजीर, गुलकंद व सीताफळ बासुंदी उत्पादन
नवी मुंबई, पुणे येथे जागा खरेदी करणे
ओला व वाळलेला चारामिश्रित आयडीयल टी.एम.आर. उत्पादन