Gokul Milk Union  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Gokul news | गोकुळमधील सत्तासंघर्ष वेगळ्या वळणावर! सहाय्यक निबंधक मालगावे यांची तडकाफडकी बदली

नव्या निबंधकांकडून एकतर्फी कार्यभार

पुढारी वृत्तसेवा

आशिष ल. पाटील

गुडाळ : गोकुळच्या अवसायनातील वादग्रस्त संस्थांची सुनावणी आणि संभाव्य निवडणूक कार्यक्रमामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे ते कोल्हापूरचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांची बुधवारी रात्री तडकाफडकी बदली करण्यात आली. त्याठिकाणी सावंतवाडीचे सहाय्यक निबंधक सुजय कदम यांची नियुक्ती झाली आहे. मालगावे यांच्या बदली आदेशामध्येच त्यांना रिलीव्ह करण्याचे आदेश असल्याने गुरुवारी (दि.२) सकाळी कदम यांनी कोल्हापूर कार्यालयात येऊन एकतर्फी पदभारही स्वीकारला आहे.

दरम्यान, गुरुवारी (दि.२) दुपारी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये गोकुळच्या निवडणुकीबाबत होणाऱ्या परस्परविरोधी याचिकांच्या सुनावणीसाठी कदम उपस्थित राहण्यासाठी गेले असताना मालगावे सुद्धा सहाय्यक निबंधक म्हणून हजर राहिल्याने बदली नाट्याचा वेगळाच अध्याय निर्माण झाला आहे. आता मालगावे आपला पदभार कदम यांना न देता थेट न्यायालयात हजर राहिल्याने हे बदली नाट्य वेगळ्या वळणावर गेल्याचे संकेत आहेत.

सहकार विभागातील बदल्या सहकार मंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात येतात सध्या महायुतीमध्ये सहकार खाते राष्ट्रवादीकडे असून मालगावे यांच्या बदलीमागे कोणती अदृश्य शक्ती आहे हे आता स्पष्ट झाले आहे.

2024 साली तत्कालीन सहाय्यक निबंधक (दुग्ध) गजेंद्र देशमुख यांची बदली झाल्यानंतर रिक्त जागी प्रदीप मालगावे यांची नियुक्ती झाली होती. भविष्यातील गोकुळच्या निवडणूक पार्श्वभूमीवर तत्कालीन माजी आमदार अमल महाडिक यांच्या शिफारसीने तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मालगावे यांची नियुक्ती झाल्याचे त्यावेळी बोलले जात होते. त्यामुळे मालगाव यांचा कालावधी संपण्यापूर्वीच त्यांची तडकाफडकी बदली झाल्याने गोकुळमधील विरोधी गटाने मुख्यमंत्री ना फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे बदली नाट्य महायुतीमध्ये कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT