Gokul Dairy | गोकुळची ‘त्या’ ४१० दूध संस्‍थांना नोटीस 
कोल्हापूर

Gokul Dairy | गोकुळची ‘त्या’ ४१० दूध संस्‍थांना नोटीस

खुलासा सादर करण्‍यास २२ जुलैपर्यंत मुदत; सभासदत्व रद्दवरून राजकारण पुन्हा तापणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : सभासदत्व रद्द करण्‍याचा आदेश असलेल्‍या त्‍या ४१० दूध संस्‍थांना गोकुळने बुधवारी (दि. १५) नोटीस बजावली. कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्‍या स्‍वाक्षरीने नोटीस पाठविण्‍यात आली आहे. संबंधित संस्‍थांना खुलासा, म्‍हणणे सादर करण्‍यासाठी २२ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. सभासदत्व रद्द करण्‍याच्‍या मुद्द्यावरून गोकुळचे राजकारण पुन्‍हा तापण्‍याची शक्‍यता आहे.

गोकुळशी संलग्‍न ४२७ दूध संस्‍थांच्‍या सभासदत्‍वाबाबत वडकशिवालेच्‍या (ता. आजरा) महादेव दूध संस्‍थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी तत्‍कालीन विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्‍याकडे तक्रार केली होती. संस्‍थांच्या चौकशीसाठी दोन सदस्‍यीय समिती नियुक्‍त केली होती. समितीने चौकशी अहवाल सादर केल्‍यानंतर विभागीय उपनिबंधक यांनी १७ संस्‍था पात्र करत ४१० संस्‍थांचे सभासदत्व रद्द करण्‍याचा आदेश गोकुळ प्रशासनाला दिला. आदेश येताच संस्‍थांनी न्‍यायालयात धाव घेतली. न्‍यायालयाने संस्‍थांच्‍या सभादत्वाबाबत निर्णय घेण्‍याचा अधिकार गोकुळला असून त्‍यांनी संबंधित संस्‍थांना म्‍हणणे मांडण्‍यांची संधी देऊन निर्णय घ्‍यावा, असा आदेश दिला.

प्रशासकांच्या आदेशानुसार नोटिसा

गोकुळ प्रशासक मंडळाची शुक्रवारी (दि. १०) बैठक झाली. बैठकीमध्‍ये अध्‍यक्ष प्रदीप मालगावे यांनी न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना संबंधित संस्‍थांना नोटीस पाठविण्‍याचे आदेश दिले. त्‍यानुसार गोडबोले यांनी बुधवारी (दि. १५) ४१० दूध संस्‍थांना यासंदर्भात नोटीस बजावली. २२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित संस्‍थांना म्‍हणणे सादर करण्‍याची मुदत दिली आहे.

गोकुळची प्रारूप मतदार यादी पुढील आठवड्यात होणार सादर

कोल्‍हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले. सहायक निबंधक कार्यालयाकडून विभागीय उपनिबंधक यांच्‍याकडे पुढील आठवड्यात यादी सादर केली जाणार आहे. विभागीय उपनिबंधक तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी देवीदास मिसाळ यांच्‍याकडून महिना अखेरीस यादी प्रसिद्ध केली जाण्‍याची शक्‍यता आहे.

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू असून पात्र दूध संस्‍थांकडून ठराव मागविण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाली. ४८४४ पात्र दूध संस्‍थांपैकी ५६ दूध संस्‍थांकडून दुबार ठराव आले आहेत. या संस्‍थांनी सुनावणी सुरू असून गुरुवारी (दि.१६) सर्व दूध संस्‍थांची सुनावणी पूर्ण होईल. यानंतर सहायक निबंधक कृष्‍णा ठाकरे हे प्रारूप मतदार यादी विभागीय उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करतील.

अवसायनातील ६४४ दूध संस्‍था यादीतून वगळण्‍यात आल्‍या आहेत. यापैकी काही संस्‍थांनी न्‍यायालयात, तर काहींनी विभागीय उपनिबंधक यांच्‍याकडे अपील केले आहे. न्‍यायालयाने १२८ दूध संस्‍थांच्‍या अवसायनाच्‍या आदेशाला स्‍थगिती दिली असून पुढील सुनावणी मंगळवारी (दि. २१) ठेवली आहे. सुनावणीमध्‍ये काय आदेश होणार, याकडे लक्ष असणार आहे. सुनावणीनंतर प्रारूप मतदार यादी सादर केली जाईल. तसेच विभागीय उपनिबंधक मिसाळ यांनीही अवसायनाच्‍या आदेशाला २५ जुलैपर्यंत स्‍थगिती दिली आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडे अपील असलेल्‍या संस्‍थांबाबत निर्णय घेऊन ते प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करतील. त्‍यामुळे पुढील आठवड्यात यादी सादर झाली, तरी ती महिनाअखेरीस प्रसिद्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT