Gokul Election File Photo
कोल्हापूर

Gokul Election : दुपारी उपमुख्यमंत्र्यांची भेट, रात्री मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

गोकुळसंदर्भात आज मुंबईत महत्त्वपूर्ण घडामोडी; चर्चेकडे जिल्ह्याचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळ निवडणूकसंदर्भात जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते व गोकुळमधील शिवसेनेचे संचालक ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी (दि.28) भेट घेणार आहेत. दुपारी बारानंतर त्यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. तर रात्री साडेआठ वाजत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला गोकुळमधील महायुतीचे नेते व काही मोजकेच संचालक उपस्थित राहणार आहेत. गोकुळबाबत मुंबईत आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार असल्याने बैठकीमधील चर्चेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. बैठकीसाठी काही संचालक सोमवारीच मुंबईत दाखल झाले, तर नेते मंगळवारी सकाळी पोहोचणार आहेत.

गोकुळमध्ये महायुतीमध्येच वाद निर्माण झाला आहे. विशेषत: राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वर्चस्ववादाचा संघर्ष सुरू आहे. संघर्षामुळे महायुतीमध्ये ताणाताणीचे वातावरण निर्माण झाल्याने गोकुळमधील शिवसेनेच्या एका संचालकांनी या संघर्षाची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिली. शिंदे यांनी याबाबतची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून घेतली व मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीसाठी पुढाकार घेतला. त्यानुसार मंगळवारी रात्री साडेआठ वाजता मुंबईत गोकुळमधील भाजप, राष्ट्रवादीमधील वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

बैठकीत या मुद्द्यांवर होणार चर्चा

बैठकीमध्ये गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा होईलच, पण प्रशासक नियुक्तीबाबत होणारी चर्चा महत्त्वपूर्ण असणार आहे. सद्यस्थितीत भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून गोकुळवर शासकीय प्रशासक आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीला शासकीय प्रशासकांची नियुक्ती नको आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांसमोर गोकुळमध्ये संचालक मंडळाला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणार आहेत. सहकार कायद्यात केलेल्या बदलानुसार हे शक्य झाले नाही तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य या पक्षांच्या प्रत्येकी एक सदस्याचा समावेश असलेल्या अशासकीय मंडळाची नियुक्ती करा, अशीही मागणी केली जाऊ शकते. यावर उपमुख्यमंत्री किती आग््राही राहणार आणि मुख्यमंत्री काय निर्णय घेणार, याकडे लक्ष असणार आहे.

दुपारी उपमुख्यमंत्र्यांची भेट

ठाण्यामध्ये दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, संचालक माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, विश्वास पाटील, अजित नरके, मुरलीधर जाधव, एस. आर. पाटील, नंदकुमार ढेंगे आदी भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

रात्री मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

मुंबईमध्ये रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महायुती नेत्यांची बैठक होईल. बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे उपस्थित असणार आहेत.

भाजप नेत्यांनाही मुंबईला बोलावले

मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी जिल्ह्यातील भाजप नेत्यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून घेतले असल्याचे समजते. सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांचा यासंदर्भातील निरोप मिळाला आहे. त्यानुसार खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, गोकुळ संचालक शौमिका महाडिक हे मंगळवारी मुंबईला रवाना होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT