कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक मोठ्या निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या घमासान न्यायालयीन लढाईत मंत्री हसन मुश्रीफच महावकील ठरले आहेत. गेल्या मार्च महिन्यापासून आजअखेर म्हणजेच तब्बल सहा महिने चाललेल्या या लांब पल्ल्याच्या न्यायालयीन लढाईत त्यांचा दृढ आत्मविश्वास आणि प्रदीर्घ अनुभवाची शिदोरीच कामी आली, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. दरम्यान, मंत्री मुश्रीफ यांनी यावर ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सन २०२३ मध्ये झालेल्या बेकायदेशीर अवसायन प्रक्रियेपासून या लढ्याला सुरुवात झाली. या सर्व संस्थांना अवसायनात काढून मतदानापासून वंचित ठेवायचे हाच विरोधकांचा मुळ अजेंडा होता. या सगळ्या वाटचालीत या संस्थांना बळ देण्याचे काम श्री. मुश्रीफ यांनी केले. आश्चर्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ही निवडणूक ९० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा सुस्पष्ट आदेश देऊनही त्याचे गैर अन्वयार्थ काढून ही निवडणूक लांबवण्याचा खटाटोपही झाला.
या सगळ्या न्यायालयीन
आणि प्रशासकीय लढाईत मंत्री हसन मुश्रीफ हेच वस्ताद ठरले आहेत. विशेष म्हणजे शासन विरोधात असतानासुद्धा त्यांनी एकाकी झुंज दिली, हे विशेष. मंत्री श्री. मुश्रीफ अगदी काल-परवापर्यंत नेहमीच जाहीर सभा आणि पत्रकार परिषदांमधून सांगत होते की, ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. कधी-कधी तर ‘मुश्रीफमुक्त गोकुळ’ करण्याच्या वल्गनाही झाल्या. अध्यक्षपदावर असलेले त्यांचे सुपुत्र नविद यांना काढून प्रशासक नेमल्याची गोष्टच त्यांच्या वर्मी लागलेली असावी. विशेष म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ राज्यातील महायुती सरकारच्या सत्तेत असतानाही राष्ट्रवादीसह शिवसेना आणि जनसुराज्य या तिन्ही पक्षावर हा अन्याय झाला. हा लढा लढताना अत्यंत कमी वेळ हातात असतानाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी ज्येेष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. श्रीनिवास पटवर्धन, ॲड. भूषण मंडलिक,ॲड. लुईस शहा, ॲड. प्रबोध पाटील, ॲड. अजयराजे निंबाळकर,ॲड. पृथ्वीराज पाटील यासारख्या जाणकार आणि नामवंत वकिलांची फौज उभी केली.
प्रदीर्घ न्यायालयीन अनुभव पाठीशी....!
कायदे कानून आणि न्यायालयीन अनुभवाच्या बाबतीत मंत्री हसन मुश्रीफ यांना संपूर्ण जिल्हा सरस मानतो. कोणतीही लढाई लढताना ती जिंकायचीच हा त्यांचा इरादा आणि आत्मविश्वासही मोठा. त्यांना असलेला प्रदीर्घ न्यायालयीन अनुभवच या सर्व कारवायांमध्ये कामी आला. किंबहुना, त्यामुळेच या लांब पल्ल्याच्या आणि गुंतागुंतीच्या न्यायालयीन लढ्यात ते महावकील ठरले आहेत.