Kolhapur Gokul News
गुडाळ: आशिष ल. पाटील
गोकुळची निवडणूक प्रक्रिया न्यायालयीन कक्षेत जाणार असल्याचे 'दै. पुढारी'मधील २८ मार्चचे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. गोकुळची निवडणूक प्रक्रिया वेळेत सुरू व्हावी, अशी याचिका काही दूध संस्थांच्या वतीने सोमवारी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झाली आहे तर अवसायन कारवाईतील वादग्रस्त ११९५ संस्थांच्या संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक कार्यक्रम सुरू करू नये, अशीही याचिका यापैकी काही संस्थांच्या वतीने सोमवारीच सर्किट बेंचमध्ये दाखल झाली आहे. गुरुवार ता. २ रोजी या याचिकांवर न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेवरून सत्तारूढ आघाडी आणि या आघाडीच्या नेत्यांच्या भाषेतील अदृश्य शक्ती यांच्यामध्ये शह - काटशहाचे राजकारण सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असलेल्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे.
गोकुळच्या आगामी निवडणुकीसाठी ५४७० संस्थांचा कट ऑफ डेटमध्ये समावेश आहे. मात्र अवसायनाची कारवाई सुरू असलेल्या ११९५ संस्थांमध्ये कट ऑफ डेटमधील १०५० संस्थांचा समावेश आहे. या वादग्रस्त संस्थांचा विषय तुर्त बाजूला ठेवून ४४२० संस्थांच्या यादीवर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करावा आणि दरम्यानच्या काळात अवसायनातून पात्र होणाऱ्या संस्थांचा पुरवणी मतदार यादीमध्ये समावेश करावा, अशी सत्तारूढ गटाची मागणी आहे. तर अवसायनातील संस्थांचा निकाल झाल्यानंतरच मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी विरोधी गटाची मागणी आहे.
आता सहकार विभाग न्यायालयाच्या आदेशाची वाट न पाहता मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करणार का? तसेच निवडणूक कार्यक्रमाबाबत उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये दाखल झालेल्या परस्परविरोधी याचिकांच्या सुनावणीनंतर न्यायालय काय आदेश देणार, यावरच गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमाचे भवितव्य अवलंबून आहे.