Satej Patil Gokul Chairmen: गोकुळ दूध संघ अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज बैठक बोलवण्यात आली होती. मात्र या बैठकीला महायुतीचे संचालक गैरहजर राहिल्याने अन् कोरम पूर्ण न होऊ शकल्याने सभा तहकूब करावी लागली. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे १३ संचालक निवडून आले आहेत. मात्र १४ चा कोरम पूर्ण होऊ न शकल्यामुळं गोकुळचा नव्या अध्यक्षाची निवड पुन्हा लांबणीवर पडली. यानंतर सतेज पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना त्यांनी हे सर्व कुठं तरी थांबलं पाहिजे अशी महायुतीतील संचालकांचीच इच्छा असल्याचं म्हणत एक बॉम्ब टाकला. सतेज पाटील म्हणाले, 'लोकशाहीत साडेपाच लाख शेतकऱ्यांनी आम्हाला कौल दिला आहे. आमच्याकडे १३ संचालकांचे बहुमत आहे. त्यामुळं कोरमचा मुद्दा न आणता महायुतीच्या संचालकांनी सभेसाठी उपस्थित राहणं अपेक्षित होतं असं सांगितलं.'
त्यानंतर सतेज पाटील यांनी, 'हे कुठंतरी थांबलं पाहिजे... बैठकीला उपस्थित रहावं अशी देखील महायुतीच्या संचालकांची इच्छा आहे. मात्र नेते काय सांगतात त्यावर त्यांचा निर्णय अवलंबून आहे. त्यामुळे महायुतीच्या संचालकांनी बैठकीला उपस्थित राहून बैठक पार पाडावी.'
शासन नियुक्त संचालकांना मताचा अधिकार दिला तर लोकशाहीला काही अर्थ राहणार नाही. मग निवडणूक कशाला घ्यायची. कोणत्याच निवडणुका घेऊ नका असा संतापही सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
सहकारात तज्ज्ञ संचालकांना मताचा अधिकार दिल्यास महापालिका, नगरपंचायत, नगरपालिकेत तज्ज्ञ नगरसेवकाला मताचा अधिकार द्यावा लागेल. फक्त गोकुळसाठी कायदा करणं महाराष्ट्राच्या हिताचं असणार नाही. तसा कायदा झाला तर तो कायद्याच्या कसोटीवर टीकेल याची खात्री देता येत नाही.
मी महायुतीचे नेते आणि संचालकांशी चर्चा केली आहे. बैठकीला उपस्थित राहायचं की नाही हा शेवटी त्यांचा निर्णय आहे. दोन्हीकडून फोडाफोडीचं राजकारण होणार नाही. ११ वाजेपर्यंत महायुतीच्या १२ संचालकांची आम्ही वाट पाहिली.
शशिकांत पाटील चुयेकर अध्यक्ष होत असतील आणि पुन्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होत असेल तर कोल्हापुरातील जनता मान्य करणार नाही. असा सूचक इशारा देखील सतेज पाटील यांनी दिला.