कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकर्यांसाठी गोकुळच्या वतीने शुक्रवारी वसुबारस पूजन करत म्हैस व गाय दुधाच्या खरेदी दरात एक रुपयाची वाढ जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे चीज, गुलाबजामून तसेच गाभण जनावरांसाठी महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन पशुखाद्य ही नवी उत्पादने बाजारात आणण्यात आली.
दूध खरेदी दरवाढीची अंमलबजावणी 21 ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे. यासाठी 35 कोटीची तरतूद करावी लागणार असून गोकुळचे गत पाच वर्षांत 13 वेळा दूध खरेदी दरात वाढ केली आहे. कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर, अर्जुन आबिटकर, के. पी. पाटील, गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, विश्वास पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
म्हैस दूध खरेदी दर 6.0 फॅट व 9.0 एसएनएफला प्रति लिटर 51.50 पैसे होता. आता तो 52 रुपये 50 पैसे होणार आहे. गायीच्या दुधाचा दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफला 33 रुपये प्रति लिटर होता. तो आता 34 रुपये होणार आहे. यावेळी संचालक अजित नरके, बाबासाहेब चौगुले, अभिजित डोंगळे, बयाजी शेळके, कर्णसिंह गायकवाड, युवराज पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, एस. आर. पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर आदी उपस्थित होते.
पशुखाद्य दर 50 रु.ने कमी
दूध खरेदी दरात वाढ करत असतानाच गोकुळच्या वतीने पशुखाद्याचे दर पोत्यामागे 50 रुपये कमी करण्यात येत असल्याचे अरुण डोंगळे यांनी सांगितले. यामुळे महालक्ष्मी गोल्ड पशुखाद्य पोत्याचा दर 1250 वरून 1200 रुपये, कोहिनूर डायमंडचा दर 1650 वरून 1600 रुपये, महालक्ष्मी गोल्ड मिनरल मिक्चरसहित 51 किलो पोत्याचा दर 1325 रुपयेवरून 1275 रुपये तर कोहिनूर डायमंड मिनरल मिक्चर 51 किलोचा दर 1725 रुपयेवरून 1675 रुपये राहील.