आशिष ल. पाटील
गुडाळ : ‘गोकुळ’च्या निर्वाचित संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 करण्याच्या पोटनियम दुरुस्तीला शासनाची मंजुरी मिळवण्यात सत्तारूढ आघाडीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना यश मिळाले असून, आगामी निवडणुकीनंतर तब्बल जम्बो संचालक मंडळ ‘गोकुळ’मध्ये असणार आहे.
दरम्यान, महाडिक गटाच्या ‘एनओसी’नंतरच मुख्यमंत्र्यांनी हा पोटनियम दुरुस्तीचा विषय मार्गी लावल्याचे वृत्त आहे. तत्पूर्वी, ना. मुश्रीफ आणि आ. अमल महाडिक यांची आगामी ‘गोकुळ’च्या निवडणूक पार्श्वभूमीवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘गोकुळ’च्या 9 सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्तारूढ आघाडीने येऊ घातलेल्या निवडणुकीत सर्वसाधारण गटात चार जादा संचालक वाढविण्याचा विषय मंजुरीला आणला होता.
तत्पूर्वी, महाडिक गटाच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी 15 जुलैच्या संचालक मंडळ बैठकीत या विषयाला विरोध केला होता. मात्र, सत्तारूढ आघाडीने 20 विरुद्ध 1 मताने हा विषय मंजूर करून सर्वसाधारण सभेसमोर आणला. वार्षिक सर्वसाधारण सभेतही महाडिक गटाने या विषयाला उघड विरोध केल्यानंतरही हा ठराव आवाजी मताने मंजूर करून घेण्यात आला. पोटनियम दुरुस्तीसाठी या विषयाला शासनाची अंतिम मंजुरी 60 दिवसांत घेणे बंधनकारक होते. महाडिक गटाने शासन पातळीवर पोटनियम मंजुरीची प्रक्रिया रोखून ठेवल्यानेच दीड महिना प्रक्रिया रखडली होती. याबाबत महाडिक गटाशी चर्चा करावी, असे निर्देश भाजपच्या राज्य नेतृत्वाने ना. मुश्रीफ यांना दिल्याची चर्चा होती.
‘गोकुळ’च्या विद्यमान संचालक मंडळातील निर्वाचित संचालकांची संख्या 21 असून, त्यामध्ये 16 जागा सर्वसाधारण गटात, तर 5 जागा राखीव प्रवर्गातील आहेत. नव्या पोटनियम दुरुस्तीप्रमाणे आता सर्वसाधारण जागांची संख्या 20 अधिक आरक्षित 5 अशी निर्वाचित संचालकांची संख्या 25 होणार आहे. त्यात संचालक मंडळातर्फे स्वीकृत 2 आणि शासन नियुक्त 1 अशा 3 संचालकांची भर होऊन एकूण 28 जणांचे जम्बो संचालक मंडळ ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीनंतर सत्तेत येईल.
एकंदरीत, संचालकवाढीचा पोटनियम शासनाकडून मंजूर झाल्याने ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीची समीकरणेही बदलणार आहेत.