Gokul Dairy pudhari photo
कोल्हापूर

Gokul Administrative Rule Ends : ‘गोकुळ’च्या नव्या संचालक मंडळाचा कारभार सुरू, प्रशासकीय राजवट संपली

दूध दरवाढीची घाई नाही, निर्णय सर्वांना विश्वासात घेऊनच : चेअरमन राजेश पाटील

रणजित गायकवाड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) नूतन संचालक मंडळाने शुक्रवारी (दि. १३) अधिकृतपणे कामकाजाला सुरुवात केली. चेअरमन राजेश पाटील यांच्यासह संचालकांनी ताराबाई पार्क येथील ‘गोकुळ’च्या कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली.

पहिल्याच दिवशी नूतन अध्यक्षांनी प्रशासकीय काळातील कामकाजाचा आढावा घेत महत्त्वाच्या निर्णयांची माहिती घेतली. प्रशासकीय राजवटीत कोणते निर्णय घेतले, दूध संकलनाची स्थिती काय राहिली, संघाच्या आर्थिक व्यवहारांवर आणि नफा-तोट्यावर काय परिणाम झाला, याची सविस्तर माहिती पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.

‘अमूल’ने दूध विक्री दरात वाढ केल्याने ‘गोकुळ’लाही दरवाढीचा विचार करावा लागणार आहे. मात्र, याबाबत महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली जाईल. मुंबई आणि पुण्यातील दूध वितरकांचीही मते जाणून घेतली जातील. ‘गोकुळ’च्या सर्व संचालकांना विश्वासात घेऊनच दूध दरवाढ किती करायची, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे चेअरमन राजेश पाटील यांनी सांगितले.

मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

नूतन संचालक मंडळ मंगळवारी (दि. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या भेटीत संघाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि प्रलंबित विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT