कोल्हापूर : निविदा न काढता ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाने कोटेशनने 3 कोटी 74 लाखांची खरेदी करून दूध संस्थांना जाजम व घड्याळ या भेटवस्तू दिल्या आहेत. खरेदी व्यवहारात सुमारे दोन कोटींचा ढपला पाडण्यात आला आहे, असा आरोप करून याप्रकरणी गोकुळचे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. चंद्रदीप नरके व आ. विनय कोरे गप्प का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे व उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे यांनी पत्रकार परिषदेत केला.
दूध संस्थांसाठी जाजम व घड्याळाची केलेली खरेदी बेकायदेशीर आहे. त्यात आर्थिक घोटाळा झाला आहे. नेत्यांच्या आशीर्वादानेच ही खरेदी झाली आहे. दूध उत्पादक शेतकर्यांच्या घामाच्या पैशांचा दुरुपयोग करून डल्ला मारला आहे. गोकुळ आता राजकीय अड्डा बनला आहे. त्यामुळेच मेडिटेशनसाठी सहकुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गोवा सहल, पशुखाद्य घोटाळा, जाजम व घड्याळ खरेदी, वासाचे दूध इत्यादी मार्गाने या गोकुळच्या हंडीतील लोणी खाण्याचे काम सुरू असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. पत्रकार परिषदेस मंजित माने व स्मिता मांडरे उपस्थित होते.
‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गेली चार वर्षे सत्ताधार्यांविरू द्ध रान उठवले, अनेक प्रश्न उपस्थित केले. परंतु, आता गोकुळची निवडणूक होऊ घातली आहे. आता महाडिक या सत्ताधारी बाकावर बसणार आहेत. मग महाडिक आता सभासदांच्या बाजूने की, सत्ताधार्यांच्या बाजूने? असा प्रश्नही पवार, देवणे यांनी उपस्थित केला. दरम्यान, गेली निवडणूक वासाचे दूध, टँकरची टक्केवारी आदींसह विविध प्रश्नांवर गाजविणारे मंत्री मुश्रीफ, आ. पाटील आदींसह इतर नेतेमंडळी आता त्याबाबत का बोलत नाहीत? अशी विचारणाही त्यांनी केली.