कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये महायुतीचा अध्यक्ष एकमताने करण्यात आला आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ची आगामी निवडणूकदेखील महायुती म्हणूनच लढविली जाईल, ती बिनविरोध कशी होईल? असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘गोकुळ’च्या कर्मचार्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. यानंतर मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते. सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी ‘गोकुळ’च्या सभासद मतदारांना टोकन देण्यास सुरुवात केल्याची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. यावरून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेली टीका, त्यानंतर महादेवराव महाडिक आणि त्यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक यांची राजाराम साखर कारखान्यावर झालेली भेट आणि त्यामध्ये ‘गोकुळ’चा विषय दिल्लीपर्यंत नेण्याबाबत ठरल्याचे सुरू असलेली चर्चा, यामुळे ‘गोकुळ’ सध्या गाजत आहे. महादेवराव महाडिक यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता मुश्रीफ यांनी, त्यांचा काही तरी गैरसमज झाला असावा. आपण त्यांचा गैरसमज लवकरच दूर करू, असे सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘गोकुळ’मध्ये महायुतीचा अध्यक्ष आहे. सध्या महायुती म्हणूनच ‘गोकुळ’मध्ये कारभार सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणूकसुद्धा महायुती म्हणूनच लढवली जाईल.
संचालकांच्या संख्येत वाढ करण्याचा विषय असेल किंवा टोकनसंदर्भात काही बोलले असतील तर त्यांचा लवकरच गैरसमज दूर करण्याचा आपण प्रयत्न करू. बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी येणार्या ग्राहकाला देण्यात येणारे टोकन एवढेच आपल्याला माहीत आहे. दुसरे टोकन कसले आपणास माहीत नाही, असेही मुश्रीफ म्हणाले. योग्यवेळी आपण सविस्तर भूमिका स्पष्ट करू, असेही त्यांनी सांगितले.