कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीत मोठा-छोटा काही नसून आम्ही जुळे भाऊ आहोत, असे जर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणत असतील तर महायुतीचा डीएनए तपासावा लागेल. जुळे भाऊ होता तर गोकुळला वादात का टाकले? आता जसे एकत्र बसला तसे सहा महिन्यांपूर्वी का बसला नाही? असे प्रश्न आ. सतेज पाटील यांनी केले. तसेच जुळे आहात की सावत्र हे आता ठरावधारकच ठरवतील. महायुतीकडे जर ४४०० ठराव आहेत तर त्यांना आमच्या पाठिंब्याची काळजी का लागली आहे, असाही प्रश्न आ. पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
आ. पाटील म्हणाले, गोकुळ मल्टीस्टेट होण्यापासून वाचवत तो दूध उत्पादकांच्या मालकीचा ठेवला. आताही गोकुळचे निर्णय मुंबई, गुजरातमधून होऊ नयेत, अशी आमची अपेक्षा आहे. गोकुळमध्ये एकमुखी नेतृत्व कोण करेल, गोकुळ अमूलच्या दावणीला कोण बांधणार नाही हे दूध उत्पादकांना माहीत आहे. गोकुळवर कोल्हापूर जिल्ह्याचीच मालकी राहिली पाहिजे, अशी दूध उत्पादकांची इच्छा आहे.
गोकुळसाठी पॅनेल शंभर टक्के होणार
गोकुळ निवडणुकीसाठी समविचारीचे १० तर महायुतीचे ११ उमेदवार निश्चित झाले आहेत. चिन्ह मागणीसाठी दोन्ही बाजूने अर्जही केले आहेत. त्यामुळे गोकुळसाठी पॅनेल शंभर टक्के होणार, असे आ. पाटील यांनी स्पष्ट केले.
मग मंत्री मुश्रीफ यांना काळजी का?
मंत्री चंद्रकांत पाटील महायुतीकडे ४४०० ठराव आहेत, असे सांगत आहेत; तर दुसरीकडे मंत्री मुश्रीफ आ. सतेज पाटील यांनी पाठिंबा द्यावा, असे म्हणत आहेत. महायुतीकडे ४४०० ठराव असतील तर मग मंत्री मुश्रीफ यांना आमच्या पाठिंब्याची काळजी का, असा प्रश्न आ. पाटील यांनी केला.
महायुतीचे ११, समविचारी आघाडीचे १० उमेदवार निश्चित
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळसाठी महायुतीचे ११ तर आ. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे १० उमेदवार निश्चित झाले आहेत. दोन्ही आघाड्यांनी गुरुवारी (दि.२४) चिन्ह मागणीसाठी केलेल्या अर्जावरून या उमेदवारांची नावे समोर आली आहे. यावरून गोकुळसाठी दोन्ही पॅनेलचे निम्मे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे.
गोकुळ निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होऊन गुरुवारी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर दोन्ही आघाडीच्या वतीने चिन्ह मागणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्याकडे अर्ज केला आहे. दोन्ही आघाडीच्या अर्जामध्ये आम्ही संबंधित आघाडीचे उमेदवार असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच दोन्ही पॅनेलकडून कपबशी चिन्हाची मागणी केली आहे.