कोल्हापूर : गोकुळ दूध संघ आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी गोकुळ निवडणुकीत आमची एकत्र येण्याची आणि संघर्ष करण्याचीही तयारी आहे. पुढील निर्णय संबंधितांचा आहे, असे महाडिक-पाटील गटाबाबत सूचक वक्तव्य गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी केले. तसेच बिनविरोधबाबत समन्वयाने मार्ग निघत असेल, संघर्ष कमी होत असेल तर त्याला पहिले प्राधान्य दिले पाहिजे, असे मतही महाडिक यांनी व्यक्त केले.
माजी संचालिका महाडिक यांनी राजकारणात कोणीही कायमचा मित्र अथवा कायमचा शत्रू नसतो. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते. गोकुळ आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आम्ही एकत्र येण्यास तयार आहे आणि निवडणूक लढण्यासही तयार आहे. पुढील निर्णय संबंधितानी घ्यायचा आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी आ. सतेज पाटील यांना उद्देेशून केले. तसेच नेत्यांमध्ये एकमत न झाल्यास गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहे. जागावाटपाचा तिढा उमेदवारी अर्ज मागे घेण्यापूर्वी सुटेल. प्रचार शुभारंभनंतर महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र दिसतील, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेची समन्वयकाची भूमिका : आबिटकर
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
गोकुळच्या निवडणुकीत शिवसेनेची समन्वयकाची भूमिका आहे. महायुतीतील सर्व चार पक्षांना सोबत घेऊन आम्ही जाणार आहोत, महायुती म्हणूनच गोकुळ निवडणूक लढवणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
अधिकाधिक जागांचा प्रत्यक्ष पक्षाचा आग्रह आहे, तो असणारच, असे सांगत आबिटकर म्हणाले, राज्यात महायुतीची सत्ता आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेत महायुतीने यश मिळवले. त्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. यामुळे गोकुळ निवडणुकीतही त्यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे.
निवडणुकीत कोणाला थांबवायचे असेल तर वरिष्ठांना सांगावे लागते. यामुळे वरिष्ठांचा तसा संपर्क असतोच, असे सांगत महायुतीकडे चांगले ठराव आहेत. यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.