Gokul dairy news | ‘गोकुळ’ : चार मेनंतर प्रशासक? Pudhari File Photo
कोल्हापूर

Gokul dairy news | ‘गोकुळ’ : चार मेनंतर प्रशासक?

सत्तारूढ-विरोधकांतील शह-काटशहाला अद़ृश्य शक्तीचा स्पर्श

पुढारी वृत्तसेवा

आशिष ल. पाटील

गुडाळ : सत्तारूढ आघाडी आणि विरोधकांच्या शह-काटशहाच्या राजकारणात ‘गोकुळ’ची निवडणूक लांबणीवर जाणार हे आता स्पष्ट झाले असून, 4 मे रोजी संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर सरकारकडून शासकीय प्रशासक नियुक्त होणार की अशासकीय सदस्यांचे प्रशासक मंडळ येणार? याकडे लक्ष लागले आहे.

गर्जनाच्या प्रकाश बेलवडे यांनी लावलेले चौकशांचे शुक्लकाष्ट आणि न्यायालयीन याचिका दाखल करून त्यांना बेजार केले असले, तरी त्यांच्या मागे कोणत्या अद़ृश्य महाशक्तीचे बल आहे हे उघड गुपित आहे. सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांची एका रात्रीत बदली करून सत्तारूढ आघाडीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना शह दिल्याची चर्चा होती. मात्र, नूतन निबंधकांनी पदभार सांभाळण्याच्या दुसर्‍याच दिवशी जाहीर केलेल्या मतदारयादी कार्यक्रमाला मुंबईतून पुण्यामध्ये स्थगिती देण्यात यशस्वी होत अद़ृश्य शक्तीने प्रतिशह दिल्याचे बोलले गेले.

संचालक मंडळाने न होणार्‍या बिनविरोध निवडणुकीचे घोंगडे गळ्यात घेऊन महायुतीच्या काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्या दौर्‍यात महायुतीमधीलच काही विशिष्ट घटकांना टाळल्याने ‘ईगो’तून या संघर्षाला अधिकच खतपाणी मिळाल्याची चर्चा आहे. आता ‘गोकुळ’मध्ये 4 मेनंतर संचालक मंडळाला मुदतवाढ मिळू नये, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आमदार सतेज पाटील यांच्याकडे सध्या ‘गोकुळ’च्या सत्तेची आणि निर्णय प्रक्रियेची निम्मी मालकी असून, त्यांना ‘गोकुळ’मधील सत्तेतून मुदत संपल्यावर तातडीने पायउतार करणे कसे आवश्यक आहे. ते मुंबईत योग्य ठिकाणी व्यवस्थित पटवून दिल्याचे सांगण्यात येत आहे.

संघर्षाला अनेक पदर

या संघर्षाला अनेक पदर असल्याची चर्चा आहे. ‘गोकुळ’ निवडणुकीतील कागलमध्ये असलेला केंद्रबिंदू अस्थिर करणे, निवडणुकीच्या जागावाटप चर्चेत सत्तारूढ म्हणून असलेली बार्गेनिंग पॉवर कमी व्हावी, संभाव्य जागावाटप ‘ठरावां’च्या कोट्यावर नव्हे, तर पक्षांच्या ताकदीवर ठरावे, असे अनेक आडाखे यामागे असल्याचे बोलले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT