कोल्हापूर : ते चेअरमन आहेत म्हणून त्यांना आत सोडता, आम्ही काँग्रेसचे म्हणून आमची आडवणूक करता का, अशा शब्दांत गोकुळचे माजी संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी संताप व्यक्त केला. निवडणूक कार्यालयातील प्रवेशावरून त्यांनी पोलिस कर्मचार्यांना सुनावले. दरम्यान, आ. अशोकराव माने यांच्यानंतर काही वेळाने गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ, विश्वास पाटील कार्यालयातून बाहेर पडण्याच्या मार्गातून आत गेल्यानंतर येथे वादावादीचा प्रसंग घडला.
गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे निवडणूक कार्यालय असून येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी हॉलच्या एका दरवाजातून प्रवेश तर दुसर्या दरवाजातून बाहेर पडण्याचा मार्ग केला आहे. सोमवारी जनसुराज्यचे आमदार अशोकराव माने येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले. यावेळी त्यांच्यासोबत असणार्या पोलिस सुरक्षारक्षकानेच आमदार आले म्हणत बाहेर पडण्याच्या मार्गातूनच त्यांचा प्रवेश केला. यावेळी येथील दरवाजावर असणार्या दोन महिला पोलिस कर्मचार्यांनी पोलिस दलातीलच कर्मचार्याने सांगितल्याने त्यांची अडवणूक केली नाही.
दरम्यान, काही वेळाने येथे गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ व विश्वास पाटील बाहेर पडण्याच्या मार्गातूनच कार्यालयात जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले. पण त्यांना तिथूनच आत सोडले. याचवेळी येथे काँग्रेसचे शशिकांत पाटील-चुयेकर हे देखील आले. त्यांनाही पोलिसांनी अडवले. त्यामुळे चुयेकर संतप्त झाले. त्यांनी, ते चेअरमन आहेत म्हणून सोडता आणि आम्ही काँग्रेसचे म्हणून अडवणूक करता का, असे सुनावत अखेर तेथूनच कार्यालयात प्रवेश केला. याचवेळी येथे असलेल्या एका भाजप कार्यकत्यानेही त्यांना सोडता आणि आम्हाला का अडवता, असे म्हणत वाद घातला. प्रताप पाटील-कावणेकर यांचे अनुमोदक असलेले नंदगाव येथील भिवाजी चौगले यांनाही प्रवेशद्वारावर पोलिसांनी रोखल्याने त्यांनीही पोलिस प्रशासनासोबत प्रवेश मिळण्यावरून वाद घातला.
भाजप जिल्हाध्यक्षांनीही सुनावले
येथे वाद सुरू असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील बाहेर पडत होते. भाजप कार्यकर्त्यांची अडवणूक केल्याने त्यांनी सर्वांना नियम सारखेच ठेवा, एकाला एक आणि एकाला दुसरी अशी वागणूक का देता, अशा शब्दांत पोलिसांना सुनावले.