आशिष ल. पाटील
गुडाळ : भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पूर्वसंध्येला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि आ. विनय कोरे यांचा शुक्रवारी दिवसभरातील पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून झालेला अचानक मुंबई दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई भेटीत दोघांनीही 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून यावेळी गोकुळच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
वर्षा निवासस्थानी गणेश दर्शनाच्या निमित्ताने आ. कोरे मुंबईला गेले असले, तरी मंगळवारी 'वर्षा'वर गणेश दर्शन करून आलेले मंत्री मुश्रीफ पुन्हा आ. कोरे यांच्या समवेत 'वर्षा'वर गेले. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत मुश्रीफ यांनी 'वर्षा'वर गणेश दर्शनाच्या निमित्ताने भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत गोकुळ निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
ही चर्चा समाधानकारक नसल्यानेच मुश्रीफ आणि आ. कोरे यांनी शुक्रवारी एक दिवसाची मुंबई वारी केल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी सकाळी विमानाने मुंबईत दाखल झाल्यानंतर रात्री पुन्हा विमानाने मुश्रीफ आणि आ. कोरे कोल्हापुरात परतल्याचे सांगण्यात आले.