कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये निश्चित झालेला जागावाटपाचा ‘फॉर्म्युला’ कायम ठेवण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईतील बैठकीत घेण्यात आला. ‘गोकुळ’ची निवडणूक महायुती एकत्रितपणे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला असला तरी नाराजांची समजूत काढण्यासाठी बुधवारी (दि. ७) कोल्हापुरात बैठक होणार आहे.
मुंबईतील बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्यचे नेते, आमदार विनय कोरे, प्रदेशाध्यक्ष समीत कदम, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित होते. पालकमंत्री आबिटकर, चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य नेते आणि त्यांचे समर्थक निवडणुकीत एकत्र येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महायुतीत यापूर्वी राष्ट्रवादीला ९, भाजप व शिवसेनेला प्रत्येकी ७, तर जनसुराज्यला २ जागा देण्याचे ठरले होते. मात्र, अधिकच्या जागांसाठी राष्ट्रवादीचा आग्रह सुरू होता. त्यातच आमदार यड्रावकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देण्याच्या मुद्द्यावरूनही राष्ट्रवादीमध्ये नाराजी होती.
बैठकीकडे इच्छुकांचे लक्ष
कोल्हापुरात पुन्हा नेत्यांची ‘पॅव्हेलियन हॉटेल’वर बैठक होईल. या बैठकीत जागावाटपानंतर नाराज इच्छुकांची समजूत काढण्यासह मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या नावांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे महायुतीतील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.