कोल्‍हापूर : महायुतीच्‍या जागावाटपासंदर्भात हॉटेल पॅव्‍हेलियन येथे झालेल्‍या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, माजी खा. संजय मंडलिक, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक, आ. शिवाजी पाटील, माजी आ. के. पी. पाटील, समित कदम उपस्‍थित होते.  (छाया: पप्‍पू अत्तार)
कोल्हापूर

Gokul Election | ताण-तणाव, नाराजी, अन् पॅनेलची निश्चिती

गोकुळसाठी महायुतीचं ठरलं, नेत्यांच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्‍कामोर्तब

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीचं ठरलं, बुधवारी सायंकाळी हॉटेल पॅव्‍हेलियन येथे ताण-तणाव, नाराजी, कही खुशी कही गम, अशा वातावरणात अखेर महायुतीचे पॅनेल निश्‍चित झाले. महायुती नेत्‍यांमध्‍ये बंदखोलीत सुमारे दीड तास खलबते सुरू होती. विशेषत: राखीव जागांवर तडजोडी करत पॅनेलमधील उमेदवारांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब झाला. मंत्री मुश्रीफ आज उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत.

गोकुळ निवडणुकीसाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार जागावाटपासंदर्भात महायुतीचे मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, माजी खा. संजय मंडलिक, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक, आ. शिवाजी पाटील, माजी आ. के. पी. पाटील, जनसुराज्‍यचे प्रदेशाध्‍यक्ष समित कदम यांची बैठक झाली. बैठकीमध्‍ये विशेषत: राखीव जागांवर चर्चा झाली.

राखीव प्रवर्गातील जागांसाठी टोलवाटोलवी

महायुतीमध्‍ये राखीव जागांसाठी टोलवाटोलवी सुरू होती. अनुसूचितची जागा शिवसेनेला नको होती. तर महिला राखीवची जागा राष्‍ट्रवादीला नको होती. जनसुराज्‍य शक्‍ती अनुसूचितची तिसरी जागा आपल्‍या पदरात पाडून घेण्‍यासाठी प्रयत्‍नशील होती. मात्र, त्‍यांना ती मिळाली नाही. त्‍यामुळे विशेषत: राखीव जागांसाठी महायुती नेत्‍यांमध्‍ये टोलवाटोलवी झाल्‍याचे दिसून आले.

कागलमध्‍ये राष्‍ट्रवादीची बैठक

महायुतीच्‍या बैठकीला येण्‍यापूर्वी राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांमध्‍ये कागल सर्किट हाऊस येथे बैठक झाली. बैठकीमध्‍ये जागावाटपाबाबत प्रमुख नेत्‍यांमध्‍ये चर्चा झाली. यावेळी माजी आ. के. पी. पाटील यांनी तीन जागांसाठी आग्रह धरला. विशेषत: त्‍यांनी किसन चौगले यांच्‍या नावासाठी आग्रह धरला.

राजाराम कारखान्‍यावर आप्‍पांचा निरोप

गोकुळसाठी भाजपकडून उमेदवारी निश्‍चित झालेल्‍या उमेदवारांना माजी आ. महादेवराव महाडिक यांनी कसबा बावडा येथील छ. राजाराम कारखाना येथे काही उमेदवारांना बोलवून घेत उमेदवारी निश्‍चित झाल्‍याचे सांगितले.

नाथाजी पाटील-धैर्यशील देसाईंमध्‍ये रस्‍सीखेच

भाजपकडूनही सहाव्‍या जागेसाठी जिल्‍हाध्‍यक्ष नाथाजी पाटील आणि गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई यांच्‍यामध्‍ये अखेरच्‍या क्षणापर्यंत उमेदवारीसाठी रस्‍सीखेच झाली. अखेरच्‍या टप्‍प्‍यात नेत्‍यांनी देसाई यांची उमेदवारी निश्‍चित केल्‍याचे समजते.

महायुतीचे संभाव्‍य पॅनेल असे

सर्वसाधारण गट : माजी आ. राजेश पाटील, सतीश पाटील, अरुण डोंगळे, युवराज पाटील, रणजितसिंह पाटील, राहुल पाटील अथवा ए. वाय. पाटील (राष्‍ट्रवादी), रणजितसिंह पाटील-यड्रावकर (आ. यड्रावकर गट) विश्‍वास पाटील, अजित नरके, मदन देसाई, अशोक फराकटे, वीरेंद्र मंडलिक, (शिवसेना) शौमिका महाडिक, अंबरिष घाटगे, डॉ. चेतन नरके, दीपक पाटील, प्रतापसिंह पाटील-कावणेकर, धैर्यशील देसाई (भाजप), अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड (जनसुराज्‍य शक्‍ती)

महिला राखीव : तेजस्‍विनी राहुल पाटील अथवा अर्चना पाटील (राष्‍ट्रवादी), स्‍मिता अजित पाटील अथवा उमा संभाजी पाटील (शिवसेना)

इतर मागास : नवीद मुश्रीफ (राष्‍ट्रवादी)

अनुसूचित जाती : माजी. आ. डॉ. सुजित मिणचेकर (शिवसेना)

भटके विमुक्‍त : विश्‍वास जाधव (भाजप)

आरबोळे मला माफ करा : आ. शिवाजी पाटील

बैठक संपल्‍यानंतर हॉटेलमधून बाहेर पडताना सोमगोंडा आरबोळे यांना मला माफ करा, असे म्‍हणत आणि अशोक चराटी यांना मिठी मारत आ. शिवाजी पाटील त्‍यांच्‍या वाहनात बसले. यावेळी त्‍यांच्‍या चेहर्‍यावर नाराजी दिसून आली. आ. पाटील यांना जागा वाटपाबाबत विचारले असता त्‍यांनी माझ्‍या तीन जागा क्‍लिअर असल्‍याचे सांगत ते बाहेर पडले.

राष्‍ट्रवादीकडून बाळासाहेब खाडेंचा पत्ता कट?

राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून जि.प.चे माजी अध्‍यक्ष राहुल पाटील यांचे निकटवर्तीय ‘गोकुळ’चे माजी संचालक बाळासाहेब खाडे यांना उमेदवारी नाकारल्‍याचे समजते. यामुळे राहुल पाटील महायुतीच्‍या बैठकीतून निघून गेल्‍याचे समजते. यानंतर शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बँकेत पाटील गटाची बैठक झाली; पण बैठकीमधील तपशील समजू शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT