Gokul election | गोकुळची निवडणूक 90 दिवसांत होणार? 
कोल्हापूर

Gokul election | गोकुळची निवडणूक 90 दिवसांत होणार?

पुढारी वृत्तसेवा

धीरज बरगे

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान सांगितल्यानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणसमोर पुढील 90 दिवसांत गोकुळची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांची सुरू असलेली सुनावणी, तोंडावर असलेला पावसाळा असे काही अडथळे निवडणूक प्रक्रियेसमोर राहणार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येणार असल्याने नव्वद दिवसांत निवडणूक होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोल्हापूर सर्किट बेंचने अवसायनातील 1,320 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण करूनच निवडणूक प्रक्रिया घ्या, असा आदेश दिला आहे. सर्किट बेंचच्या या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. या दूध संस्थांची सुनावणी पूर्ण करण्यास सहायक निबंधक कार्यालयास कोल्हापूर सर्किट बेंचने 80 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानुसार सध्या सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल, असा अंदाज सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

पावसाळा असल्याने निवडणूक थांबणार

आतापासून नव्वद दिवस धरले तर जुलै अखेरीस अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गोकुळसाठी मतदान होणे अपेक्षित आहे. मात्र, या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी असते. याच काळात जिल्ह्याला महापूरचा धोकाही असतो. त्यामुळे पावसाळ्याचाही अडथळा गोकुळ निवडणुकीसमोर असणार आहे.

प्रशासक कालावधी लांबणार

दुग्ध विभागाने सांगितल्यानुसार गोकुळची निवडणूक 90 दिवसांत पूर्ण होणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे गोकुळवरील प्रशासक कालावधीही लांबण्याची शक्यता आहे.

निवडणूक प्राधिकरण कालावधी वाढवून घेणार

गोकुळ निवडणुकीबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. दूध संस्था सुनावणी, पावसाळा यामुळे न्यायालयाला सांगितलेल्या कालावधीत निवडणूक पूर्ण करणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे प्राधिकरण निवडणुकीचा कालावधी वाढवून घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT