Gokul Election |  
कोल्हापूर

Gokul Election : संभाजी पाटील, मुरलीधर जाधव यांचा एक अर्ज बाद

उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण; नावातील त्रुटी, पोटनियमांची पूर्तता न केल्‍याचा ठपका

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी प्राप्‍त उमेदवारी अर्जांच्‍या छाननी प्रक्रियेत माजी संचालक संभाजी पाटील, मुरलीधर जाधव यांचा एक अर्ज बाद ठरला. नावातील त्रुटी, पोटनियमांची पूर्तता न केल्‍याचा ठपका ठेवत त्‍यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अवैध ठरविले; मात्र त्‍यांचा दुसरा अर्ज वैध ठरल्‍याने दोघांनाही दिलासा मिळाला आहे.

गोकुळसाठी प्राप्‍त उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी झाली. छाननीमध्‍ये सर्वसाधारण गटातून माजी संचालक संभाजी पाटील यांचा एक अर्ज नावातील त्रुटीमुळे अवैध ठरला, तर याच गटातील त्‍यांचा दुसरा अर्ज वैध ठरला. २४० दिवसांत ४० हजार लिटर दूध पुरवठा करणे या गोकुळच्‍या पोटनियमाची पूर्तता न केल्‍याने मुरलीधर जाधव यांचा अर्ज अवैध ठरला; मात्र त्‍यांचा इतर मागास प्रवर्गातील अर्ज वैध ठरला. प्रयाग चिखली येथील रघू पाटील यांचाही सर्वसाधारण गटातील एक अर्ज अवैध, तर एक अर्ज वैध ठरला. याच गटातून पद्मजा आपटे, महिला गटातून ज्‍योती दीपक पाटील, उज्ज्वला उल्‍हास पाटील यांचा, तर भटके विमुक्‍तमधून अशोक खोत, रामचंद्र डांगे, राजेंद्र जाधव यांचाही अर्ज अवैध ठरल्‍याचे समजते. छाननी प्रक्रियेसाठी उमेदवार वकिलांच्‍या फौजेसह निवडणूक कार्यालयात उपस्‍थित होते.

युवराज गवळी यांच्‍या अर्जावर आज निर्णय

युवराज गवळींचा अर्ज पशुखाद्य खरेदीची पूर्तता न केल्‍याने अवैध ठरला होता. गवळी यांनी संबंधित संस्‍थेचा पशुखाद्य खरेदीचा दाखला निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍याकडे सादर केला आहे. त्‍यांच्‍या अर्जावर आज निर्णय दिला जाणार असल्‍याचे गवळी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT