कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार आणि मंगळवार असे दोनच दिवस शिल्लक असून, भाजपकडून सोमवारी सर्व २५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयातून कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
महायुतीतील घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात असले, तरी सध्या महायुतीतील विविध घटकांकडून स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यानंतर माघारीपर्यंत कोणत्या जागा कोणत्या घटकाला मिळणार आणि अंतिम पॅनेलची रचना कशी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सोमवारी सकाळी नऊ वाजता नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. त्यानंतर शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने भाजपकडून संघटनात्मक ताकद दाखविण्याची तयारी सुरू आहे.
दुसरीकडे, महायुतीतील संभाव्य जागावाटप आणि अंतर्गत राजकीय समीकरणांचा फायदा विरोधकांच्या शाहू शेतकरी समविचारी आघाडीला होणार का, याचीही चर्चा सुरू आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष अखेरपर्यंत एकत्र राहणार की स्थानिक पातळीवरील समीकरणांमुळे वेगळी भूमिका घेतली जाणार, याचे चित्र माघारीनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या निवडणुकीत कोण कोणाला शह देणार, महायुतीची अंतिम रचना काय असेल आणि निवडणूक बिनविरोध करण्याच्या दिशेने काही राजकीय हालचाली होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर निवडणुकीतील पुढील राजकीय गणितांना अधिक वेग येणार आहे.
माघारीपर्यंंत होणार चित्र स्पष्ट
‘गोकुळ’च्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात गावागावांतील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीतील घटक पक्षांकडून स्वतंत्रपणे अर्ज दाखल होत असल्याने अंतिम पॅनेलच्या रचनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर माघारीच्या टप्प्यात जागा वाटपाचा तिढा सोडविताना कोणत्या इच्छुकांची उमेदवारी कायम राहणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार, याकडे लक्ष लागले आहे.