Gokul Election | गोकुळ : ‘समविचारी’समोर ‘महायुती’चे तगडे आव्‍हान 
कोल्हापूर

Gokul Election | गोकुळ : ‘समविचारी’समोर ‘महायुती’चे तगडे आव्‍हान

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : तीन मंत्री, दोन खासदार, आठ आमदार, गोकुळ निवडणुकीचा अनुभव असणारे मातब्‍बर नेते अन् उमेदवार असे चित्र असलेल्‍या महायुतीच्‍या पॅनेलचे तगडे आव्‍हान समविचारी आघाडीसमोर असणार आहे. त्‍यामुळे गोकुळ निवडणुकीत बलाढ्य नेत्‍यांविरोधात रणनीती आखताना आ. सतेज पाटील यांचा कस लागणार आहे. महायुती, समविचारीने पॅनेलची घोषणा केल्‍याने रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आता गोकुळचे ठरावधारक कोणाला कौल देणार, हे मतमोजणीनंतर स्‍पष्‍ट होईल.

गोकुळसाठी महायुतीसह समविचारी आघाडीने रणशिंग फुंकले आहे. घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर दोन्‍ही आघाड्यांकडून प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे. त्‍यामुळे खर्‍या अर्थाने रविवारपासून गोकुळ निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. निवडणुकीत चुरस असल्‍याने मतांसाठी साम, दाम, दंड, भेदचा वापर होणार हे निश्‍चित आहे. त्‍यामुळे पुढील आठ दिवस जिल्‍ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापणार आहे.

माजी आमदार पुन्‍हा आमने-सामने

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील विरोधक शिवसेनेचे माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर आणि काँग्रेसचे माजी आ. राजू आवळे पुन्‍हा गोकुळ निवडणुकीत अनुसूचित जाती गटातून आमने-सामने येणार आहते, तर या दोघांचा पराभव करून आमदार झालेले अशोकराव माने यांनी मात्र याच गटातून अर्ज मागे घेतला आहे.

महिला राखीवमध्‍ये तुल्‍यबळ लढती

महिला राखीवमध्‍ये महायुतीकडून शौमिका महाडिक, अर्चना पाटील तर समविचारीकडून अंजना रेडेकर, भाग्‍यश्री डोंगळे उमेदवार आहेत. महाडिक, रेडेकर यांना मागील निवडणुकीचा अनुभव आहे, तर पाटील, डोंगळे यांना राजकीय वारसा आहे. त्‍यामुळे महिला राखीवमध्‍येही तुल्‍यबळ लढत होणार आहे.

भटके विमुक्‍तमध्‍ये तेच उमेदवार

गोकुळच्‍या मागील निवडणुकीत महाडिक गटाचे विश्‍वास जाधव आणि आ. सतेज पाटील गटाचे बयाजी शेळके यांच्‍यामध्‍ये लढत झाली होती. यामध्‍ये शेळके यांनी अनुभवी जाधव यांचा पराभव केला होता. आता या निवडणुकीतही भटके विमुक्‍तमधून पुन्‍हा हेच उमेदवार एकमेकांविरोधात उभे आहेत. त्‍यामुळे मागील निवडणुकीतील पराभवाचा जाधव वचपा काढणार का, शेळके पु्‍न्‍हा बाजी मारणार, याची उत्सुकता असेल.

नविद मुश्रीफ यांच्‍यासमोर खोत यांचा शड्डू

इतर मागास गटातून गोकुळचे माजी चेअरमन नविद मुश्रीफ यांच्‍याविरोधात समविचारीकडून जि.प.चे माजी उपाध्‍यक्ष शशिकांत खोत यांनी शड्डू ठोकला आहे. पण बलाढ्य मुश्रीफ यांच्‍यासमोर खोत यांचा कितपत निभाव लागणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

सर्वसाधारण गटात लागणार कस

सर्वसाधारण गटात २० जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ४० पैकी २० उमेदवार संचालक मंडळात निवडून जाणार आहेत. तालुक्‍याचा संदर्भ येत असल्‍याने या गटात क्रॉस मतदानाचा धोका सर्वाधिक आहे. त्‍यामुळे सर्वसाधारणमध्‍ये १ ते २० क्रमांकाची मते मिळविताना उमेदवारांचा कस लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT