Gokul Election | अवसायनातील ४९२, कार्यक्षेत्राबाहेरील १७५ संस्‍था पात्र  
कोल्हापूर

Gokul Election | अवसायनातील ४९२, कार्यक्षेत्राबाहेरील १७५ संस्‍था पात्र

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : अवसायनातील ४९२ व कार्यक्षेत्राबाहेरील १७५ संस्‍था गोकुळ निवडणुकीत मतदानास पात्र ठरल्‍या आहेत. कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये मतदान यादीतील समावेशाबाबत सुनावणीदरम्‍यान गुरुवारी न्‍यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी दिलेल्‍या निर्णयानंतर या संस्‍थांचा गोकुळच्‍या मतदार यादीतील समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मंत्री हसन मुश्रीफ, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके यांना दिलासा मिळाला.

प्रारूप मतदार यादीवरील हरकतींवर सुनावणी घेऊन जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक नारायण परजणे यांनी कोल्‍हापूर सर्किट बेंच, विभागीय उपनिबंधक यांनी अवसायनाचा आदेश रद्द केलेल्‍या ४९२ आणि कार्यक्षेत्राबाहेरील १७५ संस्‍थांचे ठराव मतदानास अपात्र ठरविले होते. या निर्णयाविरोधात संस्‍थांनी सर्किट बेंचमध्‍ये धाव घेतली होती. दूध संस्‍थांतर्फे ॲड. श्रीनिवास पटवर्धन, ॲड. भूषण मंडलिक, ॲड. अजयराजे निंबाळकर, ॲड. प्रबोध पाटील, निवडणूक प्राधिकरणतर्फे ॲड. प्रल्‍हाद परांजपे यांनी बाजू मांडली. दरम्यान, पाच दिवसांत अपात्र ठरलेले ठरावधारक बदलण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले.

संस्‍था प्रतिनिधींचा ताराबाई पार्क; संचालकांचा गडहिंग्‍लजमध्‍ये आनंदोत्‍सव

कोल्‍हापूर : गोकुळ मतदार यादीत अवसायनातील ४९२ आणि कार्यक्षेत्राबाहेरील १७५ सस्‍थांचा कोल्‍हापूर सर्किट बेंचने दिलेल्‍या निर्णयानंतर मार्ग मोकळा झाल्‍याने संस्‍था प्रतिनिधींनी गोकुळच्‍या ताराबाई पार्क कार्यालय आणि सहायक निबंधक कार्यालयाबाहेर फटाक्‍यांची आतषबाजी करत जल्‍लोष केला. यावेळी कार्यालयाबाहेर संस्‍थाप्रतिनिधींनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच संपर्क दौर्‍यावर असलेल्‍या राष्‍ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्‍यच्‍या माजी संचालकांनी गडहिंग्‍लज येथे आनंदोत्‍सव साजरा केला.

ताराबाई पार्क येथे बोलताना विकास पाटील-कुरकलीकर यांनी कष्‍टकरी दूध उत्‍पादक आणि गोकुळ वाचविण्‍यासाठी सहा महिने केलेल्‍या संघर्षाला यश मिळाले आहे. न्‍यायालयाने दिलेल्‍या निकालामुळे दूध संस्‍थांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्‍याचा अदृश्‍य शक्‍तीचा डाव उधळला आहे. सहकारात राजकीय हस्‍तक्षेप चालत नाही, हे न्‍यायालयाच्‍या निर्णयावरून सिद्ध होते. त्‍यामुळे शासकीय अधिकार्‍यांनीही त्‍यांच्‍या कामामध्‍ये राजकीय हस्‍तक्षेप कितपत करून घ्‍यायचा हे यावरून ठरवावे, असा टोला लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT