पुणे : ‘गोकुळ’ची निवडणूक बिनविरोध होणार नाही. महायुतीमध्ये जागावाटपावरून एकवाक्यता नसल्यानेच बिनविरोध निवडणुकीचे ‘पिल्लू’ सोडून चर्चा भरकटविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी केला. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या उमेदवारांचे पॅनेल बुधवारी (दि. ७) जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आ. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे ‘गोकुळ’मध्ये थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे येथे महाविकास आघाडीचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सतेज पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘गोकुळ’च्या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांत जागांवरून चढाओढ सुरू आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना अधिक जागा मिळू नयेत, यासाठी महायुतीतच प्रयत्न सुरू आहेत. महायुतीत एकवाक्यता नसताना बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू केली गेली आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. दरम्यान, ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या उमेदवारांच्या पॅनेलची घोषणा बुधवारी (दि. ७) होणार असल्याने निवडणुकीतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.