Gokul : घर फिरताच ‘गोकुळ’चे वासेही फिरले Pudhari File Photo
कोल्हापूर

Gokul : घर फिरताच ‘गोकुळ’चे वासेही फिरले

राज्यातील सत्तांतराने घडविले गोकुळमध्ये सत्तांतर

पुढारी वृत्तसेवा
चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : गोकुळच्या सत्तांतराने कोल्हापूर जिल्ह्याचा नवा राजकीय इतिहास लिहिला गेला आहे. जिल्ह्याच्या बलाढ्य आर्थिक गडाची सूत्रे कालपर्यंत जिल्ह्यातील नेते हलवत होते. पहिल्यांदाच यामध्ये राज्याच्या नेत्यांचा प्रवेश झाला आहे. त्याचबरोबर सहकारात पक्ष नसतो, असे सांगणार्‍या नेत्यांना पक्षाच्या दावणीची जाणीव राज्यातील नेत्यांनी जाणीवपूर्वक करून दिली आहे. यापुढील काळात महायुतीची ही दावण नेते अधिक घट्ट करतील. कारण त्यांना आपला राजकीय विस्तार वाढवायचा आहे. त्यामुळे जिल्ह्यात मी म्हणेल ते हे यापुढे चालणे अवघड दिसते. नेत्यांवरचा लगाम कसला गेला आहे. राज्यातील सत्तांतराने गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणले आहे; तर महाविकास आघाडीने जिल्ह्यातील पॉलिटिकल पॉवर हाऊस गमावले आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळचे महत्त्व मोठे आहे. वार्षिक चार हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल हे बलाढ्य आर्थिक साम्राज्य तर आहेच. त्याचबरोबर दूध संकलन आणि दूध पुरवठ्याच्या माध्यमातून सर्वदूर पसरलेली यंत्रणा गोकुळच्या ताब्यात आहे. गाव, वाडी, वस्तीवर गोकुळचा राबता आहे. त्यामुळे गोकुळवरील वर्चस्वासाठी लढाई टोकदार असते. जिल्हा बँक, जिल्हा परिषद, महापालिका, बाजार समिती येथे सत्तांतर घडविलेल्यांचा विजयरथ महाडिकांनी गोकुळमध्ये रोखला होता. त्याला शिड्या लावायला विरोधकांना वीस वर्षे लागली.

जिल्ह्यातील नेत्यांनी एकजूट बांधली म्हणूनच गोकुळमध्ये सत्तांतर घडू शकले. यामध्ये महत्त्वाचा वाटा होता तो विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांचा. त्यांनी आपल्या संस्थांचे ठराव सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके आदींच्या नेतृत्वाखाली आघाडीकडे सोपविले आणि गोकुळच्या सत्तांतरावर शिक्कामोर्तब केले. सुरुवातीला अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे आग्रही होते. मात्र ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर विश्वास पाटील यांना दोन वर्षे अध्यक्षपद दिले गेले. पुढची दोन वर्षे डोंगळे यांना दिले. त्यानंतरच्या एक वर्षाच्या अध्यक्षपदाचा निर्णय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात येणार होता. मुदत संपण्यापूर्वीच अरुण डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गोकुळचा पुढचा अध्यक्ष महायुतीचा होणार असेल तरच आपण राजीनामा देऊ, असे म्हणत बंडाचा झेंडा उभारला. त्यामुळे शांतपणे चाललेल्या गोकुळमध्ये खळबळ उडाली. नेते अस्वस्थ झाले. डोंगळे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यावर नेत्यांनी 18 संचालकांची एकजूट करून डोंगळे यांना एकाकी पाडले.

डोंगळे यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत नेत्यांकडून अध्यक्षपदासाठी कोणते नाव येते याची वाट पाहिली. सतेज पाटील यांचे समर्थक कोल्हापूर दक्षिणमधील शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव पुढे येताच डोेंगळे यांनी चाली रचल्या. त्यांना पडद्याआडून धनंजय महाडिक यांची साथ मिळाली. काँग्रेसधार्जिणा चेहरा महाविकास आघाडीचा उमेदवार अध्यक्षपदी नको. आता हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे, असे फडणवीस आणि शिंदे यांना सांगण्यात आले. त्यापूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे जिल्ह्यातील नेत्यांना हा निर्णय घेऊ द्यावा अशी आग्रही विनंती केली होती.

अखेर शेवटच्या दोन दिवसात हालचाली होऊन अध्यक्षपदाची माळ महायुतीचे नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली. त्यापूर्वी बुधवारी महायुतीच्या नेत्यांच्या निरोपानंतर जिल्ह्यातील नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला हसन मुश्रीफ, प्रकाश आबीटकर, विनय कोरे, चंद्रदीप नरके आदी नेते उपस्थित होते. यातच उमेदवार बदलाचा निर्णय झाला.

गोकुळच्या सत्तांतरात राजर्षी शाहू आघाडीकडून निवडून आलेल्या संचालकालाच अध्यक्ष करायचे आणि सत्ताधारी आघाडी चलबिचल होऊ द्यायची नाही असा सर्व संमतीचा उमेदवार म्हणून नविद मुश्रीफ यांचे नाव पुढे आले. अध्यक्षपदाचा उमेदवार बदलण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मुश्रीफ, कोरे, आबीटकर यांच्यावर दबाव आणला होता. नविद मुश्रीफ आता गोकुळचे अध्यक्ष झाले आहेत. गोकुळच्या संचालक मंडळाची पुढील वर्षी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ता कायम राखण्याचे आव्हान मुश्रीफ यांच्यापुढे असेल. अर्थात त्यांच्या मागे खूप मोठी राजकीय ताकद आहे. मात्र यापुढे गोकुळच्या निवडणुका पक्ष संघटनेच्या आडूनच आघाडी म्हणून होतील हे मात्र नक्की.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गोकुळचे तत्कालिन अध्यक्ष अरुण डोंगळे यांना शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारात गुंतवले आणि राजकारणाचा नवा अध्याय दिला गेला. डोंगळे यांची महायुतीच्या नेत्यांशी उठबस वाढली. राज्यातील सत्तांतराने गोकुळमध्ये सत्तांतर घडविले. फडणवीस, शिंदे यांच्याकडून केवळ महायुतीचा अध्यक्ष करा एवढाचा निरोप देण्यात आला होता. त्यांच्याकडून कोणत्याही नावाचा आग्रह नव्हता. यापुढे गोकुळचा अध्यक्ष मुंबईतून ठरणार हे यातून स्पष्ट झाले आहे. निवडणुकाही पक्षाचे उमेदवार आघाडीच्या माध्यमातून लढतील असे दिसते. महायुती काहीही करून गोकुळ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करेल हेही स्पष्ट झाले आहे.

महाविकासचा अध्यक्ष झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला विचारू नका

शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव पुढे येताच ते काँग्रेसचे तसेच कोल्हापूर दक्षिणमधील सतेज पाटील गटाचे निकटवर्तीय आहेत. गोकुळची आर्थिक ताकद प्रचंड आहे. ही सगळी ताकद स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मागे उभी राहील. त्यामुळे आपल्या संस्थेत आपले बहुमत असूनही आपली अडचण होईल. अध्यक्ष कोणालाही करा, पण महायुतीचा करा म्हणजे पुढच्या निवडणुकीत आपल्याला सोपे जाईल; अन्यथा या निवडणुकीच्या निकालाबाबत भाजपचे नेेते म्हणून आम्हाला विचारू नका, अशी थेट भूमिका महायुतीच्या नेत्यांकडे धनंजय महाडिक यांनी मांडल्याचे समजते. त्यानंतरच हे सगळे राजकारण घडले.

सतेज-मुश्रीफ यांना वेगळे पाडण्याची रणनीती

गोकुळ, जिल्हा बँकेच्या राजकारणात सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे सख्य सर्वांना माहीत आहे. चुयेकर यांच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून ही जोडी प्रबळ होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वेगळे चित्र समोर जाईल, यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मोट बांधली. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे आपले ऐकणार नाहीत याची खूणगाठ बांधलेल्या नेत्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर महायुतीच्या नेत्यांकडून दबाव आणला आणि या दोघांना वेगळे पाडण्याची रणनीती यशस्वी केली.

फॉर्म्युला वन ... ते... गोकुळ रेस

नविद मुश्रीफ हे फ्रान्सला गेले होते. तेथे त्यांना फॉर्म्युला वन रेस ही पाहायची होती. त्याचे नियोजनही त्यांनी केले होते. मात्र गोकुळच्या घडामोडी एवढ्या वेगाने झाल्या की, निरोप येताच त्यांना फॉर्म्युला वन रेस सोडून कोल्हापुरात परतावे लागले. गुरुवारी जिल्हा बँकेत गोकुळचे संचालक नेत्यांच्या निर्णयाची वाट पाहात थांबले होते. तेव्हा कोणीतरी मुश्रीफ यांना थेट कसा झाला दौरा, असे विचारताच ‘काय नाय हो. रेस बघायची होती. खरं हे सगळं झालं आणि मला दौरा अर्धवट टाकून यावं लागलं’, असे मुश्रीफ म्हणाले. मात्र मुश्रीफ यांची फॉर्म्युला वन रेस चुकली तरी भल्याभल्यांना मागे सरकवत त्यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाची रेस लीलया जिंकली.

पिता-पुत्र जिल्ह्याच्या केंद्रस्थानी

हसन मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून ते सध्या वैद्यकीय शिक्षणमंत्री आहेत. त्यांचे चिरंजीव नविद हे पहिल्यांदाच गोकुळमध्ये संचालक म्हणून निवडून आले असून पहिल्याच टप्प्यात त्यांना अध्यक्षपद मिळाले आहे. जिल्ह्यातील बलाढ्य आर्थिक गडाची सूत्रे त्यांच्या हाती आली आहेत. दुसर्‍या आर्थिक गडाचे म्हणजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ आहेत. त्यामुळे केडीसीसी, गोकुळ आणि कॅबिनेट मंत्रिपद हे सारे मुश्रीफ यांच्या कुटुंबात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT