Kolhapur Gokul Dudh Sangh Election Pudhari
कोल्हापूर

Gokul Election : सोमवारी केवळ 18 उमेदवारांची माघार! अद्यापही 218 उमेदवार बाकी!

मुंबईत आज अंतिम निर्णायक घडामोडी घडणार?

पुढारी वृत्तसेवा

आशिष ल. पाटील

गुडाळ : गोकुळच्या उमेदवारी अर्ज माघारीसाठी अवघे तीन दिवस उरले असतानाही इच्छुकांनी माघारीकडे पाठ फिरवल्याने सोमवारी (दि.५) केवळ 18 अर्ज मागे घेण्यात आले. अद्याप 218 अर्ज बाकी आहेत. दरम्यान, महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये ट्विस्ट असल्याने आघाड्यांची रचना अंतिम झालेली नाही. त्यादृष्टीने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर अंतिम घडामोडी अपेक्षित आहेत. दोन्ही आघाड्यांनी अंतिम उमेदवारांच्या याद्या गुलदस्तात ठेवल्याने उमेदवारी अर्ज माघारीकडे इच्छुकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

आज सोमवारी सर्वसाधारण गटातून 11 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये माजी संचालक अभिजीत तायशेटे शेटे यांच्या पत्नी आरती, कर्णसिंह गायकवाड यांच्या पत्नी भाग्यश्री, केडीसी च्या संचालिका श्रुतिका काटकर यांचे पती ॲड. शाहू काटकर, कुंभीचे प्रकाश देसाई या प्रमुखांचा समावेश आहे. महिला राखीव गटातूनही आरती तायशेटे आणि भाग्यश्री गायकवाड यांच्यासह पाच महिला उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. इतर मागासवर्गीय गटातून एक आणि भटक्या विमुक्त जाती गटातून एक अशा दोन उमेदवारी अर्ज माघार घेतली. अनुसूचित जाती गटातून मात्र एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही.

आता सर्वसाधारण गटातून 134, इतर मागासवर्गीय गटातून 36, महिला गटातून 28, विमुक्त भटक्या जाती गटातून 11, तर अनुसूचित जाती-जमाती गटातून 9 असे एकूण 218 उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी ८ आक्टोंबरला उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख असून या दिवशीच अर्ज माघारसाठी झुंबड उडणार आहे.

दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात आ. राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचा राष्ट्रवादीच्या कोट्यात समावेश केल्याने राष्ट्रवादीला आठच जागा मिळणार आहेत. ना. मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते त्यामुळे अस्वस्थ आहेत. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ना. मुश्रीफ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या भावना त्यांच्या कानावर घालणार आहेत. ना. मुश्रीफ यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कडे समन्वयका ची भूमिका बजावणारे आ. विनय कोरे हे परदेश दौऱ्यावर असून मंगळवारी ते मुंबईत परतण्याची शक्यता आहे. त्यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीच्या कोट्यात एखादी जागा वाढणार का? याकडे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

शिवसेनेचे सहयोगी सदस्य असलेले आ. राजेंद्र यड्रावकर यांनी गोकुळ जगावाटपात आपला शिवसेना कोट्यात समावेश व्हावा यासाठी तर माजी आमदार सुजित मिणचेकर आणि मुरलीधर जाधव यांनी गोकुळ मध्ये आपल्याला पुन्हा संधी मिळावी म्हणून सोमवारी स्वतंत्रपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर आणि आ. चंद्रदीप नरके यांच्याशी चर्चा करूनच ना. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कोट्यातील गोकुळ च्या उमेदवार यादीला हिरवा कंदील दाखवतील असे सांगण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT