कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या बदनामीप्रकरणी प्रकाश बेलवाडे यांच्याविरोधात प्रशासक मंडळाने गुन्हा दाखल करण्याचा ठराव करूनही अद्याप कारवाई का केली नाही, असा जाब गोकुळ दूध संस्था प्रतिनिधींनी विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांना विचारला. तसेच गोकुळच्या बदनामीत हातभार न लावता नावलौकिक वाढविण्यात योगदान द्या, असेही सुनावले. पुण्यातील त्यांच्या कार्यालयावर धडक देत मागण्यांचे निवेदन दिले.
गोकुळची सातत्याने नाहक बदनामी करणाऱ्या प्रकाश बेलवाडे यांच्याविरोधात प्रशासक मंडळाने ठराव केला असतानाही फिर्याद दाखल झालेली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बेलवाडे यांना अधिकारी एवढे घाबरतात कशासाठी, असा सवाल उपस्थित करत तातडीने कारवाईची मागणी केली. यावेळी शशिकांत खोत, मनोज फराकटे, विकास पाटील, शिवाजीराव देसाई आदी उपस्थित होते.
प्रमुख मागण्या अशा :
सन २००० ते २०२५ या कालावधीतील वार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्तांत उपलब्ध करावेत.
संचालक मंडळाच्या बैठकींचे इतिवृत्त व ठरावांच्या प्रती द्याव्यात.
वेंकटेश्वरा गुडस्े मुव्हर्स व गायत्री कोल्ड स्टोरेज यांच्याशी संबंधित ठेके, निर्णय व देयकांची माहिती द्यावी.
गायत्री कोल्ड स्टोरेजमुळे झालेल्या कथित नुकसानीबाबतची कारवाई स्पष्ट करावी.
सन २००० पासूनची ताळेबंद व नफातोटा पत्रके उपलब्ध करून द्यावीत.
हलाल प्रमाणपत्रासंदर्भातील गैरसमज आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती जाहीर करावी.
...तर जनावरांसह मोर्चा काढू
शिष्टमंडळाने उपनिबंधकांना संघाच्या कारभारासंदर्भातील विविध माहिती देण्यास प्रशासक मंडळाकडून टाळाटाळ होत असल्याची तक्रार केली. मागितलेली माहिती न मिळाल्यास उपनिबंधक कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्याबरोबरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावर राजकुमार पाटील यांनी संबंधित विषयांची माहिती घेऊन प्रशासक मंडळाची बैठक बोलावण्यात येईल व त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.