Kolhapur Gokul Dudh Election | शिवसेनेचे सहयोगी आ. यड्रावकर मुश्रीफांसोबत 
कोल्हापूर

Kolhapur Gokul Dudh Election | शिवसेनेचे सहयोगी आ. यड्रावकर मुश्रीफांसोबत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सहयोगी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी राष्‍ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना साथ दिली आहे. राष्‍ट्रवादीच्‍या ठरावधारकांनी केलेल्‍या शक्तिप्रदर्शनामध्‍ये आमदार यड्रावकर यांचे बंधू जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगराध्‍यक्ष संजय पाटील-यड्रावकर उपस्‍थित होते. त्‍यांनी गोकुळ, जिल्‍हा बँक निवडणुकीत आम्‍ही मंत्री मुश्रीफ यांच्‍यासोबत राहणार असल्‍याचे प्रसारमाध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

शिरोळ तालुक्याला गेली दहा वर्ष ‘गोकुळ’चे प्रतिनिधित्‍व मिळालेले नाही. त्यामुळे या तालुक्यातील दूध उत्पादकांसह दूध संस्थांचे प्रश्‍न सोडविताना अडचणी आल्या. मागील निवडणुकीत माजी संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांना हातकणंगलेसह शिरोळचेही प्रतिनिधीत्व दिले. परंतु, ते आज तुमची कामे केली. ठराव का देत नाही, असे विचारत आहेत. मात्र, त्यांनी तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही संचालक झाला हे त्यांनी विसरू नये. यासाठीच आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिरोळ तालुक्यातील १७० दूध संस्थांचे ठराव मंत्री मुश्रीफ यांना दिल्याचे संजय पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

कोटीची पैज लावतो, ‘गोकुळ’ बिनविरोध होणार

‘गोकुळ’ निवडणूकसंदर्भात बोलताना नगराध्‍यक्ष यड्रावकर यांनी ‘गोकुळ’ची निवडणूक बिनविरोध होणार असल्‍याचा दावा केला आहे. त्‍यांनी कोटीची पैज लावतो, कोर्‍या स्‍टॅम्पवर लिहून देतो; पण निवडणूक बिनविरोध होणार, असे विश्‍वासाने सांगितले. हे सांगत असताना मी स्‍पष्‍ट बोलतोय, असा खुलासा त्‍यांनी केला.

समविचारी आघाडीला साथ देऊया, ‘गोकुळ’ टिकवूया

कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. २५) मंत्री हसन मुश्रीफ यांच्‍या नेतृत्‍वाखाली राष्‍ट्रवादीने जोरदार शक्‍तिप्रदर्शन केले. मात्र, राष्‍ट्रवादीच्‍या ठरावधारकांचा मेळावा असलेल्‍या महासैनिक दरबार हॉलच्‍या प्रवेशद्वारासमोरच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा फोटो असलेला अन् ‘शाहू शेतकरी समविचारी आघाडीला साथ देऊया, ‘गोकुळ’ वाचवूया,’ असा आशय असलेला फलक चांगलाच चर्चेत आला. विविध ठिकाणी उभारलेल्‍या फलकांची जिल्‍ह्यात चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीच्या ठरावधारकांनी शक्‍तिप्रदर्शनाने जात सहा‍यक निबंधक कार्यालयात ठराव दाखल केले. यावेळी महासैनिक दरबार हॉलसमोर आणि ‘गोकुळ’ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर आ. सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे बॅनर्स उभारले आहेत. गेल्या पाच वर्षांत म्हैस दुधाला १४ रुपये, तर गाय दुधाला १० रुपये दरवाढ दिल्याचे सांगत या स्वाभिमानी आघाडीला साथ देऊया, ‘गोकुळ’ टिकवूया,’ असा संदेश या पोस्टरबाजीतून दिला आहे. राष्ट्रवादीच्या शक्‍तिप्रदर्शनासह आ. पाटील यांच्या या पोस्टरबाजीची चर्चा दिवसभर सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT